अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

सहकाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नारीशक्तीचा सहभाग आवश्यक – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

शिर्डीत सहकार भारतीच्या ‘नारीशक्ती आणि सहकारिता अधिवेशनाचे’ उद्घाटन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी-शंकर सोनवणे 

 

लोणी-महिलांचा सहभाग सहकार क्षेत्रासाठी केवळ पर्याय नसून सहकाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेला आधार आहे, असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

सहकार भारतीच्या वतीने शिर्डी येथे आयोजित दोन दिवसीय ‘नारीशक्ती आणि सहकारिता अधिवेशनाचे’ उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, राष्ट्रीय महिला अध्यक्षा रेवती शेंदूर्णीकर, प्रदेशाध्यक्ष दत्तारामजी चावके, महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली आवाडे, महामंत्री विवेक जुगादे, संघटन मंत्री संजय पाचपोर आणि उपाध्यक्ष रवीकाका बोरावके उपस्थित होते.

मंत्री विखे-पाटील म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा ठरत आहे. शेती, उद्योग, बँकिंग आणि तंत्रज्ञानासह सहकार चळवळीतही यशस्वी नेतृत्व करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. महिलांना सहकार क्षेत्रात अधिक संधी मिळाल्यास त्याचा व्यापक फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला होऊ शकतो.

“बचत गटाच्या चळवळीतून महिलांनी आर्थिक उलाढालीचा इतिहास निर्माण केला आहे. बचत गटांच्या चळवळीला सहकार क्षेत्राशी जोडून महिलांना संधी दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चित्र बदलू शकते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बचत गटांना दिलेल्या कर्जाची वसुली शंभर टक्के असल्याचे सांगत बँकिंग क्षेत्रात शिस्त आणायची असेल तर महिलांना अधिक संधी देण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सहकार क्षेत्रातील बदलांमध्ये महिलांना प्राधान्य दिले आहे. सहकार चळवळीत महिलांचा सहभाग वाढवायचा असेल तर सहकार भारतीने प्राथमिक सहकारी सोसायट्यांच्या कार्यप्रणालीबाबतही काम सुरू करावे, असे आवाहन विखे-पाटील यांनी केले.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. ‘सहकारातून समृद्धी’ हे ब्रीद घेऊन केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून विविध निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणासाठी तीन कोटी ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सहकार भारतीच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली आवाडे आणि महामंत्री विवेक जुगादे यांचीही भाषणे झाली. अधिवेशनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!