अहिल्यानगर जिल्हागुन्हेगारीनेवासा तालुका

सोनईत एलसीबीची धडक कारवाई; दादरा-नगर हवेलीतून आलेली विदेशी दारू जप्त

ब्रिझा कारसह १०.८८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; प्रविण धाडगे, राजेंद्र जावळे व संदिप गायकवाड यांच्यावर गुन्हा, तिघेही फरार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

सोनई (ता. नेवासा) – दादरा आणि नगर हवेली, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेली विदेशी दारू आणून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदा येथे करण्यात आलेल्या या कारवाईत विदेशी दारूसाठ्यासह ब्रिझा कार असा एकूण १० लाख ८८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २९ सप्टेंबर रोजी सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना त्यांना विदेशी दारूसाठ्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चांदा, ता. नेवासा येथे कारवाई केली. संभाजी कचरू गायकवाड यांच्या घरासमोर उभी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या ब्रिझा कारची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली.

झडतीमध्ये रॉयल स्टॅग कंपनीच्या १८० मिलीच्या ६२४ बाटल्या, किंमत ५६ हजार १६० रुपये, तसेच इंपीरियल ब्लू कंपनीच्या ४८० मिलीच्या ३८४ बाटल्या, किंमत ३२ हजार ६४० रुपये, असा एकूण ८८ हजार ८०० रुपयांचा विदेशी दारूसाठा आढळून आला. याशिवाय सुमारे १० लाख रुपये किमतीची ब्रिझा कार पोलिसांनी जप्त केली.

पोलिसांनी संभाजी कचरू गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता, प्रविण नानासाहेब धाडगे, राजेंद्र बापुराव जावळे आणि संदिप शिवाजी गायकवाड, सर्व रा. चांदा, ता. नेवासा, यांनी हा दारूसाठा विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी संबंधितांचा शोध घेतला; मात्र तिघेही मिळून आले नाहीत.

या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड तसेच पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, विकास साळवे, अमृत आढाव आणि बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने केली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!