
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
पाथर्डी – प्लॉट विक्रीतून मिळालेले नऊ लाख रुपये घेऊन घरी जात असलेल्या दीपक येळाई यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी हल्ला करून त्यांच्या ताब्यातील नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी दिवसाढवळ्या पाथर्डी शहरातील पेठ परिसरात नवरंग कापड दुकानासमोर घडली. या झटापटीत येळाई जखमी झाले आहेत.
दीपक येळाई हे प्लॉट विक्रीतून मिळालेले नऊ लाख रुपये घेऊन घरी जात होते. ते पेठ परिसरातील नवरंग कापड दुकानासमोर आले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत येळाई यांना दुखापत झाली.
चोरट्यांनी येळाई यांच्या ताब्यातील नऊ लाख रुपयांची रोकड हिसकावून घेतली आणि दुचाकीवरून घटनास्थळावरून पोबारा केला. दिवसाढवळ्या शहरातील वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पोलिस निरीक्षक नितीन कंडारे यांनी गुरुवारीच पाथर्डी पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच शहरात नऊ लाख रुपयांची लूट झाल्याने अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला जात आहे.जखमी दीपक येळाई यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आमदार मोनिका राजळे, उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू आणि पोलिस निरीक्षक नितीन कंडारे यांनी रुग्णालयात भेट देऊन येळाई यांची विचारपूस केली.



