धार्मिक

कोपरगाव शहरात काळे गटाचा धार्मिक कार्यक्रमात धिंगाणा; सुभद्रानगरात भूमिपूजनावेळी तणाव

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – श्री स्वामी समर्थ मंदिर, सुभद्रानगर येथे सभामंडप व परिसर सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास युवानेते विवेक कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नगराध्यक्ष पराग संधान व नगरसेवकांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करून भूमिपूजन करण्यात आले.

मात्र, या धार्मिक व मंगल प्रसंगी काळे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी धिंगाणा घालत गोंधळ निर्माण केला व कामाला विरोध दर्शविला. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थित नागरिकांमध्ये काळे गटाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे.

कोपरगाव नगरपरिषदेत सत्तांतर झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांना गती मिळू लागली आहे. बदललेल्या नेतृत्वामुळे कामकाजात वेग आणि परिणामकारकता दिसून येत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. मात्र अशा विकासकामांनाच विरोध करून काळे गटाने आपली नकारात्मक भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केल्याची चर्चा रंगली आहे.

“धार्मिक स्थळी वाद निर्माण करू नका, राजकीय जोडे मंदिर परिसराच्या बाहेर ठेवा,” असे आवाहन युवानेते विवेक कोल्हे यांनी केले होते. तरीदेखील काळे गटाने स्थानिक नागरिकांनाही विरोध करत कार्यक्रमात व्यत्यय आणल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली.

विशेषतः नवीन पालिका पदाधिकाऱ्यांनी धार्मिक व सांस्कृतिक स्थळांच्या विकासावर भर दिला जात असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या सभामंडप बांधकामामुळे मंदिर परिसरात भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या प्रकल्पामुळे धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन तसेच सामाजिक उपक्रमांसाठी सुसज्ज जागा निर्माण होणार असून परिसराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. मात्र काळे गटाला यातही राजकारण करण्यात अधिक रस असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, याच कामाचे श्रेय घेण्यासाठी आधी फलकबाजी करण्यात आली आणि त्यानंतर त्याच कामाला विरोध करण्यात आला. यावरून काळे गटाची दुतोंडी भूमिका उघड झाल्याचा जोरदार हल्लाबोल कोल्हे गटाकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्र पूर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत सुमारे ३७ लाख ७२ हजार रुपयांच्या निधीतून सांस्कृतिक भवन उभारणीचे हे काम हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमामुळे सुभद्रानगर परिसराच्या विकासाला नवे बळ मिळणार असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

“हा निधी कुणाचेही वैयक्तिक श्रेय नसून खऱ्या अर्थाने नागरिकांचा अधिकार आहे. त्यामुळे याचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये,” असे मत नगराध्यक्ष पराग संधान यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, बांधकाम सभापती निलोफर पठाण, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, रवींद्र नरोडे, प्रसाद आढाव, विजय वाजे, वैभव गिरमे, योगेश बागुल, हरिभाऊ गिरमे, राजेंद्र सालकर, कलविंदर दडियाल, स्वप्निल मंजुळ, संतोष शिंदे, आकाश वाजे, नाना भुजबळ, संजय सातपुते, अतुल काले, अनिल आव्हाड, रवींद्र कथले, संतोष शेजवळ, गुरमित दडियाल, मयूर गायकवाड, सोमनाथ मस्के, विजया देवकर, पल्लवी दडियाल, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र जाधव, अमोल अजमेरे, संजय उदावंत, दत्तू पगारे, विक्रमामदित्य सातभाई, उमेश गोसावी, महेंद्र नाईकवाडे, निसार शेख, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, रोशन शेजवळ, कुंदन भारंबे, धनंजय आढाव, भाऊसाहेब आढाव यांसह पदाधिकारी, नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!