
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – ग्रामीण प्रश्नांना न्याय मिळवून देणारे, निर्भीड लेखणीने राज्यात वेगळी ओळख निर्माण करणारे सामाजिक पत्रकार शंकर किसन सोनवणे यांचा आज लोणी ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यंदाचा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र गौरव रत्न २०२५” पुरस्कार जिंकून सोनवणे यांनी ग्रामीण पत्रकारितेचा आवाज राज्यभर दुमदुमवला आहे.
७ डिसेंबर रोजी श्रीरामपूर येथे प्रथमच भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाचा आनंद आज लोणी गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सत्कार सोहळ्यात माजी उपसरपंच अनिल विखे, एन. डी. विखे सर, भाऊसाहेब तुकाराम विखे पाटील, वी. वी. कार्यकारी सोसायटी चेअरमन किशोर धावणे पाटील, श्री राजेंद्र मते पाटील, आर. एन. पर्वत साहेब, वाबळे पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाल, पुष्पगुच्छ आणि अभिनंदनचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामीण समस्यांवरील त्यांचे भेदक लिखाण, प्रशासनाला जागे करणारी पत्रकारिता आणि सामाजिक-शैक्षणिक उपक्रमांतील सहभाग यामुळे राज्यात त्यांची वेगळी छाप पडली आहे. ग्रामीण भागातील दुर्लक्षित प्रश्न राज्य पातळीपर्यंत पोहचवण्याचे त्यांनी केलेले कार्य लोकशाही बळकट करणारे असल्याचे मान्यवरांनी गौरविले.
या पुरस्काराबरोबरच सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने देखील त्यांचा विशेष सत्कार केला. अनेक संघटनांनी शुभेच्छांचा वर्षाव करत जिल्हाभरात अभिनंदनाचा माहोल निर्माण केला आहे.लोणी ग्रामस्थांच्या अभिनंदन सोहळ्याने “महाराष्ट्र गौरव रत्न २०२५” पुरस्काराचे औचित्य अधिक उजळून निघाले असून, हा सन्मान ग्रामीण पत्रकारितेच्या सामर्थ्याची दखल असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.




