
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील चितळी परिसरातील मध्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या सत्यम डिस्टिलरीज प्रा. लि.च्या तळ्यातून जळगाव परिसरात असणाऱ्या शेतात मळीमिश्रित पाण्याचा अनियंत्रित निचरा होत असल्याने परिसरातील शेती आणि जलस्रोत गंभीरपणे प्रभावित झाले आहेत. दूषित पाण्यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यवस्थापक संजय धोत्रे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत पाणी काढून देण्याचे आश्वासन दिले, परंतु मळीमिश्रित पाण्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत कोणतीही स्पष्ट जबाबदारी घेतलेली नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

चितळी-राहाता रोड लगत असणाऱ्या मळीच्या तळ्यापासून सुमारे 200 मीटर अंतरावर जळगाव परिसरात असलेल्या गट क्रमांक 137 मध्ये शेतकरी अशोक शिनगारे व अरुण शिनगारे यांची साडेतीन एकर शेती आहे. या शेतात भाजीपाला आणि चारा पिकांची लागवड झाली होती. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसादरम्यान, डिस्टिलरीच्या तळ्यातील मळीमिश्रित पाणी शेतात शिरले. परिणामी, सर्व पिके पूर्णपणे नष्ट झाली असून जमिनीवर पिवळसर थर साचलेला दिसतो आहे. सध्या उभ्या असलेल्या पिकांनाही मोठा फटका बसला असून शेती तात्पुरती वापरायोग्य राहिलेली नाही.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, “मागील अनेक वर्षांपासून हा त्रास सुरू आहे. व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही डिस्टिलरी व्यवस्थापन व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.आता आमच्या विहिरींमध्येही मळीमिश्रित पाणी साचले असून पुढील पिकांचे नियोजन धोक्यात आले आहे,” अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.

चितळी परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये देखील या दूषित पाण्याचा परिणाम दिसून येतो आहे. त्यामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर नागरिकांचे आणि जनावरांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे त्वचारोग, पोटाचे विकार यासारख्या आजार वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासन, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तातडीने लक्ष देऊन मळीच्या निचऱ्यावर नियंत्रण ठेवण्याची आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक भरपाई देण्याची ठाम मागणी केली आहे.




