पर्यावरणबिबट्याचा हल्लामहाराष्ट्र

चितळी-जळगाव शिवारात मृत मादी बिबट आढळली;दोन बिबट्यांच्या झटापटीत मादी बिबटचा मृत्यू वनविभागाचे स्पष्टीकरण

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – राहाता तालुक्यातील चितळी-जळगाव शिवारात शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका शेतात मादी बिबट मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.वनविभागाने भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये नैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

राहाता–चितळी रोडलगत भोर हॉटेल नजीक अरुण शिनगारे यांच्या शेतात शुक्रवारी सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास एक बिबट मृत अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. शिनगारे यांचा मुलगा सकाळी शेतातील पिकांकडे फेरफटका मारण्यासाठी गेला असता त्याला खाली बसलेल्या अवस्थेत बिबट दिसून आला. तेव्हा तो घाबरून घराकडे पळत आला व शेतात बिबट असल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांना दिली. त्यानंतर शिनगारे शेताकडे गेले असता त्यांनी बिबट मृत अवस्थेत असल्याची खात्री केली.

अरुण शिनगारे यांनी या घटनेची माहिती जळगावचे सरपंच शिवाजी साबदे व चितळीचे सरपंच नारायणराव कदम यांना दिली. त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून बिबट मृत अवस्थेत असल्याची माहिती दूरध्वनीद्वारे वनविभागाला दिली. माहिती मिळताच कोपरगाव श्रीरामपूर राहाता तालुका वनपाल भगवान जाधव, वनक्षेत्रपाल महेबुब शेख वनरक्षक सविता थोरात,विलास डगळे, राहुल कानडे, डॉ. शिवाजी बाचकर तसेच वाइल्डलाईफ रेस्क्यू टीमचे सार्थक शिंदे आदींसह रेस्क्यू टीमचे कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.मृत अवस्थेत असलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान सदर मृत मादी बिबट अंदाजे एक वर्ष वयाची असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी बाचकर यांनी मादी बिबटचे पोस्टमार्टम केले. तपासणीत दोन बिबट्यांच्या झटापटीत मादी बिबटच्या मानेवर जखम झाल्याचे आढळून आले. जखमी अवस्थेतच बिबटचा जागेवर मृत्यू झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले. त्यानंतर मादी बिबटवर नियमानुसार घटनास्थळी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 

राहाता तालुका बनतोय बिबट्यांचा आगार?

राहाता तालुक्यातील चितळी, जळगाव, धनगरवाडी, वाकडी, रामपूरवाडी, पुणतांबा, चांगदेवनगर आदी सर्वच वाड्या-वस्त्यांच्या परिसरात मागील दोन ते तीन वर्षांपासून बिबट्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे.आत्ता पर्यंत दोन निष्पाप चिमुकल्यांचे जीव गेले आहे.राहाता तालुका बिबट्यांचा आगार बनला असून येथे एवढ्या मोठ्या संख्येने बिबटे कुठून येतात, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. तालुक्यातील प्रत्येक भागात असंख्य बिबटे असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या परिसरात बिबट्याकडून माणसांवर हल्ल्याच्या घटना घडत असून भरदुपारी किंवा सकाळच्या वेळीही शेतात बिबटे दिसून येत आहेत. कधी कधी नागरिकांचा थेट पाठलाग करण्याचे प्रकारही घडत आहेत. कुत्रे, शेळ्या, कोंबड्या यांसह पाळीव प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे.

 

 

चितळी-जळगाव शिवारात अंदाजे एक वर्ष वयाच्या मादी बिबटचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ रेस्क्यू टीमसह आम्ही चितळीत दाखल झालो.पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी १ वनविभाग बिबट रेस्क्यू टीमने मृत बिबटची तपासणी केली.दोन बिबट्यांच्या झटापटीत तिच्या मानेवर खोल जखमा झालेल्या होत्या. यामुळेच तिचा मृत्यू झाला असून भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ प्रमाणे बिबटचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.— भगवान जाधव, तालुका वनपाल, श्रीरामपूर

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!