पर्यावरणभौगोलिकमहाराष्ट्र

वाकडी शिवारात बिबट्याचे चार बछडे आढळले; परिसरात खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता तालुक्यातील वाकडी शिवारात शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजून २० मिनिटांच्या सुमारास जाधव-पानसरे वस्ती परिसरात रस्त्यालगत असलेल्या शेतात बिबट्याचे चार बछडे आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती तात्काळ कोपरगाव वनविभागाला देण्यात आली आहे.

वाकडी शिवारातील जाधव-पानसरे वस्ती रोडवरून वाहनाने जात असताना रस्त्यालगत असलेल्या शेतात काही हालचाल होत असल्याचे प्रत्यक्षदर्शी उपसरपंच सुरेश जाधव व सागर जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ वाहन थांबवून गाडीच्या लाईटचा प्रकाश त्या दिशेने टाकला असता त्यांना त्या ठिकाणी तब्बल चार लहान बिबट्याचे बछडे दिसून आले. यावेळी त्यांनी बछड्यांचे फोटोही मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले.

 

यानंतर त्यांनी काही वेळ थांबून परिसरात मादी बिबट आहे का याचा अंदाज घेतला; मात्र त्या वेळी बछड्यांजवळ मादी बिबट दिसून आली नाही. कदाचित मादी बिबट आसपासच्या परिसरात शिकारीच्या शोधात गेली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

दरम्यान, मादी बिबट आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी अत्यंत आक्रमक होऊ शकते, त्यामुळे वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाकडी शिवारात दिवसेंदिवस बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!