
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक ठिकाणी ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम तब्बल आठ-नऊ महिन्यांपासून रखडले आहे. विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर होऊनही प्रत्यक्षात कॅमेरे बसवले गेले नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. साधारण आठ महिन्यांपूर्वी विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी हा प्रश्न उपस्थित करून तात्काळ सीसीटीव्ही बसवावेत असा ठराव मंजूर करण्याची मागणी केली होती. १५ व्या वित्तआयोगाच्या निधीतून संबंधित काम होणार होते. २०२५-२६ वर्षाच्या आराखड्यात काम घेण्यात आले होते. सदर काम वेळेत होणे अपेक्षित होते. मात्र सभा होऊन आठ ते नऊ महिने उलटून गेले तरी गावात सीसीटीव्ही बसले नसून ग्रामस्थांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरातही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव असून गावाची सुरक्षा सध्या ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यापूर्वी गावात वादाच्या काही घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामपंचायतीत दि.२१ जुलै २०२५ रोजी विशेष ग्रामसभा घेऊन गावात शेकडो ग्रामस्थांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आग्रही मागणी केली होती. सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत हा विषय कोरममध्ये घेऊन सभेचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. शासनाकडून मिळणाऱ्या १५ व्या वित्तआयोगाच्या निधीतून हे काम तात्काळ करण्यात येईल, असे त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले होते. मात्र गावात इतर कामांना प्राधान्य दिले गेले, पण अतिगरजेच्या या कामाला अंदाजे आठ-नऊ महिने उलटूनही मुहूर्त सापडला नाही.
स्थानिकांकडून या प्रकरणाची विचारणा सुरू झाल्यानंतर प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव-एलमवाडी परिसर मोठा असून प्रमुख ठिकाणी ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग होणारे अद्यावत कॅमेरे बसविणे काळाची गरज आहे. याचे निरीक्षण थेट ग्रामपंचायत कार्यालयातून होणे आवश्यक आहे. गावातील धार्मिक स्थळे, शासकीय कार्यालये, स्मशानभूमी, मंगल कार्यालय, पाणी साठवण तलाव, मुख्य चौक, प्रमुख रस्ते, शाळा व अंगणवाडी परिसर येथे कॅमेरे बसविण्याची गरज आहे. तसेच सरकारी दवाखाना, वॉटर एटीएम, पाण्याच्या टाक्या, विहिरी तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणीही कॅमेरे बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सदर परिसर श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाणे अधीन चितळी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत येत असल्याने गावातील महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवून त्यांचा समन्वय पोलीस प्रशासनाशी केल्यास परिसरात अनुचित घटना घडल्यास तपास करणे सुलभ होण्यास मदत होऊ शकते. मात्र या बाबीकडे ग्रामपंचायतीने अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जळगाव-एलमवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाचा २०२५-२६ च्या आराखड्यात समावेश करण्यात आला असून टेंडर प्रक्रियेतही त्याचा समावेश करण्यात आला आहे. या कामासाठी चालू वर्षी जानेवारी महिन्यात निधी प्राप्त झाला आहे. कामासाठी अंदाजित ३ लाखांचा निधी खर्च होणार असून गावात ४० ठिकाणी कॅमेरे बसविण्याचा विचार आहे. मात्र मागील फेब्रुवारी महिन्यात ग्रामपंचायतीवर प्रशासकराज लागू झाल्याने गावठाणातील महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे काम सध्या थांबले आहे.– सतीश दिघे, ग्रामपंचायत अधिकारी
जळगाव परिसर खूप मोठा असून गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे अद्यावत कॅमेरे बसविण्याची गरज आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आठ महिन्यांपूर्वी विशेष ग्रामसभेत ठराव घेऊनही वेळेत काम केले नाही. अजूनही गावात कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. हे काम महत्त्वाचे असून यात दिरंगाई झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ कॅमेरे बसविण्याची कार्यवाही करावी.– विजय चौधरी, ग्रामस्थ जळगाव




