प्रशासकीयमहाराष्ट्र

सोळा लाख रुपये वसुलीसाठी जैन स्थानकाच्या तीन खोल्यांना पालिकेने ठोकले सिल

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी – गोपाल शिंदे

 

श्रीरामपूर – पालिकेची थकलेली घरपट्टी वसूल करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी कंबर कसली असून शहरातील जैन स्थानकास सात दिवसांची आगाऊ नोटीस देऊनही जैन स्थानक विश्वस्थानीं सोळा लाख रुपये थकबाकी न भरल्याने जैन स्थानकाच्या प्रथम मजल्यावरील तीन खोल्या मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या आदेशाने व उपमुख्याधिकारी महेंद्र ताकपिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली कर्मचाऱ्यांनी सील केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

 

            शहरात छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील जैन स्थानक हे शहरातील व शहराबाहेरील जैन समाज बांधवांचे धार्मिक कार्यासाठी श्रद्धेचे ठिकाण आहे.गेल्या सत्तावीस वर्षांपासून रमेश लोढा हे या स्थानकाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अधिपत्याखाली जैन स्थानकाचा कारभार चालू आहे. त्यांच्या कारभाराबाबत जैन समाजातील एक गट त्यांच्या कारभारा विरोधात लढा देत आहे.जैन समाजाला विश्वासात न घेता धर्मादाय आयुक्तांनी स्थानकाला घालून दिलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचा या गटाचा आरोप आहे. त्यांच्यातील अंतर्गत वाद हे न्यायालयापर्यंत देखील गेल्याने पालिकेच्या आजच्या सिल ठोको कारवाईने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असणाऱ्या या गटाने केलेल्या आरोपांना पुष्टी मिळते.

 

              सकाळी अकरा वाजता पालिकेच्या वसुली विभागाचे पंधरा ते वीस कर्मचारी उपमुख्याधिकारी महेंद्र ताकपिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई साठी सज्ज होते.जैन स्थानकात पालिका वसुली कर्मचाऱ्यांचा लवाजमा जवळपास अर्धा तास बसल्यावर त्याठिकाणी स्थानकाचे विश्वस्त कल्याण कुंकुलोल हे त्याठिकाणी येऊन त्यांनी उपमुख्याधिकारी ताकपिरे यांच्याशी बोलणी केली त्यातून रक्कम भरनेबाबत समाधानकारक असा कोणताही तोडगा न निघाल्याने उपमुख्याधिकारी ताकपिरे यांनी कर्मचाऱ्यांना स्थानका चे वरील दोन्ही मजले सील करण्याचे आदेश दिले त्यास सुरुवातीला कल्याण कुंकुलोल यांनी विरोध केला व स्थानकाच्या मुख्य दरवाजाला सील करा वरील खोल्याना सील करू नका ही त्यांची मागणी धुडकावून पहिल्या मजल्यावरील तीन खोल्या पालिका कर्मचाऱ्यांनी सील केल्या व कारवाई तात्पुरती थांबवली.याबाबत पालिकेचे वसुली अधिकारी विकास घटकांबळे यांचेशी संवाद साधला असता त्यांनी सील करणेबाबतचे साहित्य पालिकेकडे कमी असल्याने जैन स्थानकाच्या पहिल्या मजल्यावरील तीनच खोल्या सील केल्याचे सांगितले.

 

            महिला दिनानिमित्त जैन स्थानकात आदर्श महिला मंडळाने भव्य असा महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमास विद्यमान नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या पत्नी व राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या सेक्रेटरी सौ.दिपालीताई ससाणे,भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड यांच्या पत्नी सौ. रुपालीताई छाजेड व नगरसेविका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या उपस्थितीत याठिकाणी कार्यक्रम असल्याने पालिकेने कालची कारवाई आज केल्याने शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.जैन स्थानक विश्वस्त व्यवस्थापनाबाबत जैन समाजातील एका गटाने मात्र पालिकेच्या या कारवाईचे स्वागत तर विश्वस्त समितीच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे.दोन दिवसांपूर्वी या लाखो रुपयांच्या थकबाकी साठी जैन स्थानक समितीचे विश्वस्त कल्याण कुंकुलोल यांच्या निवासस्थानी नगराध्यक्ष करण ससाणे व पालिका वसुली अधिकाऱ्यांची बैठक झाली असल्याचे विरोधी गटातील एकाने सांगितल्याने आजची कारवाई जुजबी स्वरूपाची केल्याचे बोलले जात आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!