
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चितळी येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मिरवणूक, झांज पथक वाद्यांसह भव्य सोहळ्याने परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रमोद तोरणे, सहाय्यक प्रमुख विभागीय अधिकारी उत्तर विभाग, नगर हे उपस्थित होते. तसेच जैन श्रावक संघ, श्रीरामपूर चे अध्यक्ष श्री रमेशशेठ लोढा हे अध्यक्षस्थानावर होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. कैलास महाले यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात श्री प्रमोद तोरणे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन पार पडले. अध्यक्षीय सूचना श्री धनवटे यांनी तर अनुमोदन श्री बर्डे यांनी दिले. प्रास्ताविकात प्राचार्य श्री एन. एन. शिरसाट यांनी शाखेचा इतिहास मांडत भौतिक सुविधेअभावी शाळेच्या गुणवत्तेवर निर्माण झालेल्या अडचणी स्पष्ट केल्या.
कार्यक्रमात विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार माजी विद्यार्थी सतीश श्रीराम मुजुमदार (अमेरिका) यांच्याकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ४०,००० रु. देणगीतून करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा महेश हरगुडे हिची महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागात स्थापत्य अभियंता म्हणून झालेल्या निवडीबद्दल सत्कार झाला. कु. सानवी महेंद्र चौधरी हिने कर्मवीरांवर मनोगत व्यक्त केले.
यावेळी रमेशजी लोढा यांनी विद्यालयास सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ७१,००० रु. देणगी जाहीर केली. तर गणेश सहकारी साखर कारखाना, श्रीरामपूरचे चेअरमन श्री सुधीर लहारे यांनी शाळेचा जागेचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेब मोरे यांनी विद्यालयाच्या अडचणीं मांडत सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.प्रमुख व्यक्ते प्रा.कैलास महाले यांनी कर्मवीरांचा जीवनपट, त्याग व संघर्ष याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष श्री गंगाधर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीरांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास गंगाधर चौधरी, गणेशचे संपतराव चौधरी, उपसरपंच दिलीपराव चौधरी,शंकरराव चौधरी, दीपकराव वाघ, भाऊसाहेब मोरे, अॅड. अशोकराव वाघ, लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम, मच्छिंद्र चौधरी,विक्रम वाघ, सुभाषराव वाघ, चंद्रकांत वाघ, विजय चौधरी, बाबासाहेब चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण झुराळे यांनी केले. बक्षीस वितरणाचे कामकाज यशवंत एन. एन. यांनी पाहिले तर आभार प्रदर्शन आर. एस. हिवाळे यांनी केले.




