
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील जळगावात कृषी परंपरेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या बैलपोळ्याचा सण यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी परंपरेप्रमाणे बैल जोड्या गावच्या वेशीवर आल्यानंतर शुभशकुन म्हणून गावातील ज्येष्ठांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात येऊन बैल जोड्यांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर सर्व बैलजोड्या गावातील ग्रामदैवत श्री.रोकडोबा महाराज मंदिरासमोर एकत्र आणण्यात आल्या.यावेळी ग्रामस्थांनी बैलजोडीला ग्रामदैवतासमोर नतमस्तक करून वाकवणी करण्याची पारंपरिक प्रथा उत्साहात पार पाडली.पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणुकीला मंगलमय स्वरूप प्राप्त झाले.यावेळी पूजनानंतर शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना डोक्यावरून हात फिरवत पुरणपोळीचा नैवेद्य प्रेमाने खाऊ घातला.या क्षणी गावातील वातावरण आनंदमय झाले.

या निमित्ताने पंचक्रोशीतून आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना पारंपरिक रीतीने सजवून गावातील मिरवणुकीत सहभाग नोंदविला.फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेली ही मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे स्थान अतिशय मोलाचे आहे.

वर्षभर ३६५ दिवस शेतात काम करणाऱ्या या बैलांचा सन्मान करण्यासाठीच बैलपोळा सण साजरा केला जातो.शेतकऱ्यांच्या श्रमशील बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करत गावकऱ्यांनी या उत्सवात एकोप्याचा संदेश दिला.पोळ्याच्या निमित्त सकाळीच बैलांना पाण्याने स्वच्छ स्नान घालण्यात आले.साधेपणाने सजविण्यात आले होते.त्यांच्या अंगावर हलक्या रंगाची रांगोळी, डोक्यावर झुली, तर पायात घुंगरं अशा साध्या पण पारंपरिक सजावटीत बैल मिरवणुकीत दिसले.जेष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात शिस्तबद्धता,परंपरेचे जतन आणि बंधुभावाचे दर्शन घडले. साधेपणातही उत्साह आणि समाधान यामुळे जळगावकरांचा बैलपोळा यंदा विशेष ठरला.

“आजच्या आधुनिक युगात ट्रॅक्टर व यंत्रांच्या वापरामुळे शेतीत यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे बैलांचा उपयोग काहीसा घटला असला तरीही जळगाव गावातील अनेक शेतकरी आपल्या बैलजोड्यांना केवळ शेतीकामाचे साधन न मानता कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपतात. त्यांच्या आहार, विश्रांती आणि आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. शेतकरी सकाळ-संध्याकाळ बैलांची सेवा करतात. घरातील लहानग्यांप्रमाणे त्यांना लळा लावतात. हा प्रेम व निष्ठेचा बंध पाहिला की बैल हे शेतकऱ्यांसाठी फक्त श्रमाचे साथीदार नसून भावनिक नात्याचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट होते.”




