
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी –उसावरील हुमणी अळीचे वेळीच नियंत्रण करा नियंत्रणासाठी शेतकऱ्याने एकत्रित प्रयत्न करतानाच जैविक आणि रासायनिक या दोन्ही घटकांचा वापर शेतकऱ्यांनी करुन प्रकाश सापळ्यांचा उपयोग करावा. ऊस उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान अवगत करावे आणि या माध्यमातून आपले ऊस उत्पादन वाढावे असे प्रतिपादन डाॅ. विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव शिरसाठ यांनी केले.
प्रवरा परिसरामध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे आणि गेल्या आठ वर्षांपासून या ऊस पिकावर दरवर्षी हुमणी अळीचा प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान होत असते.जलसंपदा मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरा कारखान्याच्या ऊस विकास विभागाअंतर्गत काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी यांच्यासाठी ऊसामधील हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात शिरसाठ बोलत होते. यावेळी संचालक ज्ञानेश्वर खर्डे, बाळासाहेब लाटे, ज्ञानदेव आहेर ,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शैलेश देशमुख, कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी संजय मोरे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
केंद्राचे प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशमुख यांनी उस पिकांतील ए.आय.तंञज्ञानाविषयी माहीती देतांनाच उस लागवड तंञ आणि खोडवा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.तर हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन यावर मार्गदर्शन पीक संरक्षण विभागाचे भरत दवंगे यांनी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून हुमणी किडीवर नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल यामध्ये जैविक किड नियंत्रण, प्रकाश सापळ्याचा वापर, घरगुती पद्धतीने आणि रासायनिक कीडनाशकांचा वापर याविषयी माहिती दिली.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांच्या वतीने परिसरातील हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचा वापर या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले या प्रात्यक्षिका अंतर्गत निवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रकाश सापळ्याचे वाटप मान्यवरांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रियंका खर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन भरत दवंगे यांनी केले.
