
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील शिर्डी राहाता व पुणतांबा मंडळातील शेतकऱ्यांना सन २०२५ च्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या प्रधानमंत्री पिक विम्याचा परतावा अजूनही मिळालेला नाही.त्याउलट राहाता तालुक्यातील बाभळेश्वर लोणी आणि अस्तगाव येथील शेतकऱ्यांना विम्याचा परतवा मंजूर झाला आहे.मात्र पुणतांबा मंडळातील ४,५६० शेतकरी, राहाता मंडळातील २,५९० आणि शिर्डी मंडळातील १,२३७ शेतकऱ्यांचे मिळून सुमारे १२ हजाराहून अधिक अर्ज अद्याप प्रलंबित दिसत आहेत.त्यामुळे तालुक्यातील शिर्डी-राहाता- पुणतांबा मंडळातील शेतकऱ्यांवर कृषी विभागाने दुजाभाव केल्याची भावना निर्माण झालेली आहे.
राहता तालुक्यामधील अस्तगाव बाभळेश्वर लोणी या मंडळातील सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सन २०२५ मध्ये भरलेल्या पीक विम्यास परतावा मंजूर झालेला असून. असे असताना राहता तालुक्यामधीलच राहाता पुणतांबा व शिर्डी हे मंडळ कुणाच्या चुकीमुळे वगळले गेले यंदा पीक कापणी प्रयोगाच्या आधारे मंडळनिहाय परतावा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये बाभळेश्वर मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी १७ हजार ५०० रुपये, तर लोणी आणि अस्तगाव मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये विमा परतावा मंजूर झाला आहे. या तीन मंडळांतील सुमारे ६,५९७ शेतकऱ्यांच्या अर्जाना हिरवा कंदील मिळाला असून, खरीप हंगाम तोंडावर असताना या रकमेचा शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मंजूर झालेली आहे. मात्र त्यापैकी दुसरीकडे, पुणतांबा, राहाता आणि शिर्डी या तीन मंडळांतील परिस्थिती मात्र चिंताजनक आहे.धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेबाबत स्थानिक कृषी विभाग पूर्णपणे अनभिज्ञ असून, त्यांच्याकडे कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. कृषी विभागाच्या या बेजबाबदार आणि गाफील कारभारामुळे शेतकऱ्यांची मोठी हेळसांड होत असून, हक्काचा विमा मिळवण्यासाठी त्यांना ताटकळत राहावे लागत आहे. नव्या हंगामाची तयारी करण्यासाठी पैशांची गरज असताना, प्रलंबित मंडळांचा प्रश्न शासन कधी मार्गी लावणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सन २०२५ चा प्रधानमंत्री पीक विम्याचा परतावा मंजूर करण्यावेळी कृषी विभागाने बाभळेश्वर अस्तगाव व लोणी मंडळाला सर्वात आधी प्राधान्य दिले त्या बरोबरीने मात्र राहता शिर्डी व पुणतांबा मंडळाला कुठलाही पिक विमा परतावा मिळालाच नाही २०२५ मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये राहता तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये खरीप पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले होते. अशा वेळेला प्रधानमंत्री पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरणारी होती पण तालुक्यामध्येच जर काही मंडळांना दुजाभाव होत असेल न्याय कोणाकडे मागायचा,एवढेही असताना लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहे.राहता तालुक्यातील शिर्डी राहता व पुणतांबा मंडळातील समस्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना 2025 अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ जमा करण्याची मागणी ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, गणेशचे संचालक संपतराव चौधरी, शेतकरी मच्छिंद्र चौधरी,आण्णासाहेब चौधरी, भागवतराव चौधरी, सुरेश चौधरी, बाजीराव चौधरी, पंढरीनाथ चौधरी,बाळासाहेब वाघ, दत्तात्रय चौधरी, रंगनाथ चौधरी, गोपीनाथ चव्हाण, शरद चौधरी, शिवाजी चौधरी, सचिन चौधरी, भास्कर चौधरी आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रधानमंत्री पीक विम्याचा परतावा मंजूर करण्यावेळी कृषी विभागाने बाभळेश्वर अस्तगाव व लोणी मंडळाला सर्वात आधी प्राधान्य दिले,शिर्डी राहाता पुणतांबा या तिन्ही महत्त्वाच्या मंडळातील हजारो शेतकऱ्यांना वगळले,येथील हजारो शेतकऱ्यांवर अन्याय झालेला असून,त्यावेळी तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टीने भरपूर नुकसान झाले होते. सध्याही कांदा, सोयाबीन, मका तसेच अन्य पिकांना योग्य बाजारभाव मिळत नाही.अशा परिस्थितीमध्ये पिक विम्याच्या परताव्यात शिर्डी राहाता पुणतांबा मंडळातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने समाविष्ट केले नाही.शासनाने तात्काळ खरीप हंगामातील पिक विम्याची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू करावी.- मच्छिंद्र जगन्नाथ चौधरी,प्रगतशील शेतकरी,जळगाव




