महाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

चितळी-जळगावच्या कन्यांनी पुणे पोलीस दलात निवड होऊन रोवला मानाचा झेंडा; ग्रामस्थांकडून जल्लोषात सत्कार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – राहाता तालुक्यातील चितळीची कु. साक्षी गणेश वाघ तसेच जळगावची कु. मयुरी कैलास जोशी या दोघींचीही पुणे शहरात पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड होऊन पोलीस दलात सहभाग झाल्याबद्दल चितळी येथील जय हनुमान मित्र मंडळ, जळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, रोकडोबा महिला ग्राम संघ (महाराष्ट्र राज्य) तसेच जय भोले ग्रुप जळगाव यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.यावेळी ग्रामस्थांनी पंचक्रोशीतून भव्य मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.युवतींच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले होते.

प्रथमच चितळी व जळगाव येथील लेकींनी महिला पोलीस होत नवा पायंडा पाडल्याने परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर या दोन्ही युवतींनी पोलीस कॉन्स्टेबल बनण्याचे स्वप्न साकार केले.

पोलीस भरतीच्या मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना व्यक्त झाली.निकाल लागताच विजयाचा गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सर्वसामान्य कुटुंबातील या मुलींनी शासकीय सेवेत रुजू होत चितळी-जळगाव पंचक्रोशीत प्रथम महिला पोलीस होण्याचा मान मिळवला आहे.

जळगावची कु. मयुरी कैलास जोशी हिचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुलीला शिक्षण दिले. मयुरी ही राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू असून तिचे प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण मामाच्या गावी श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल येथे झाले.त्यानंतर अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण सीडीजेन कॉलेज ऑफ कॉमर्स येथे पूर्ण केले.पुढे पाथर्डी येथील शिव छत्रपती अकॅडमीमध्ये पोलीस भरतीची तयारी करून तिने यश मिळवले.

चितळी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कु. साक्षी गणेश वाघ हिनेही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उल्लेखनीय यश संपादन केले. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चितळी येथे झाले, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चितळी येथे पूर्ण झाले. पुढे श्रीरामपूर येथील रावबहादुर नारायणराव बोरावके महाविद्यालयातून पदवी शिक्षण घेतल्यानंतर संगमनेर येथील ज्ञानराज अकॅडमीतून पोलीस भरतीसाठी तिने तयारी केली.

या दोन्ही युवतींनी यावर्षीच्या पोलीस भरती परीक्षेत उत्तम गुणांसह मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळवत आपले स्वप्न साकार केले.त्यांच्या या यशामुळे चितळी व जळगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!