प्रशासकीयभौगोलिकमहाराष्ट्रशेती

राहाता तालुक्यात ६१ गावांत पीक नुकसानीचे पंचनामे सुरू; १०३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

तहसीलदार अमोल मोरे व तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांच्याकडून दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील ६१ गावांमध्ये पावसाने ४५ दिवसांहून अधिक काळ दडी मारल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. या गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगाम २०२६ साठी ट्रिगर-१ लागू करण्यात आला असून, प्रांत अधिकारी माणिक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पीक नुकसानीच्या संयुक्त पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे.

तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि गटविकास अधिकारी विवेक गुंड यांच्या समन्वयातून पंचनाम्यांची कार्यवाही सुरू आहे. तालुक्यात राहाता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा, शिर्डी आणि अस्तगाव अशी सहा महसूल मंडळे असून, खरीप पिकांचे एकूण क्षेत्र ४९ हजार ७९९ हेक्टर आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन, मका आणि चारा पिके सुकून गेल्याने उत्पादन घटण्याचे संकट निर्माण झाले आहे.

४१.८५ टक्के ई-पीक पाहणी पूर्ण

२८ सप्टेंबरपर्यंत राहाता तालुक्यात ४१.८५ टक्के ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. उर्वरित क्षेत्रातील पीक पाहणीचे काम सुरू असून, शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी तालुक्यात १०८ पीक पाहणी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

१०३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

२८ सप्टेंबर रोजीच्या शासन आदेशानुसार ट्रिगर-१ लागू झालेल्या ६१ गावांमध्ये संयुक्त पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी १०३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये ६ मंडळ अधिकारी, ३१ ग्राम महसूल अधिकारी, ३८ ग्रामपंचायत अधिकारी, २० सहाय्यक कृषी अधिकारी, ४ उपकृषी अधिकारी आणि ४ पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पंचनाम्यासाठी कागदपत्रे आवश्यक

पीक पंचनाम्याच्या कार्यवाहीसाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, ८-अ, आधार लिंक असलेले बँक पासबुक, आधारकार्ड आणि फार्मर आयडी सोबत द्यावा. आधारकार्डवर मोबाईल क्रमांक नमूद केलेला असणे आवश्यक आहे. नियुक्त नोडल अधिकारी म्हणजेच कृषी सहायक अथवा ग्रामपंचायत अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीच्या पिकाचा नोट कॅममध्ये रंगीत फोटो काढणार आहेत.पंचनाम्यानंतर ग्रामस्तरीय समितीकडून त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी पंचनाम्यांचा दैनंदिन अहवाल सादर करायचा आहे. पंचनाम्यांच्या अहवालात शेतकऱ्यांचे गट क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते तपशील आणि मोबाईल क्रमांकाची माहिती सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

आठ दिवसांत ६१ गावांचे पंचनामे

पुढील आठ दिवसांत राहाता तालुक्यातील सर्व ६१ गावांमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष शेतातील पिकांची पाहणी करून नुकसानीची नोंद केली जाणार असून, पंचनाम्याच्या आधारे शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. २८ सप्टेंबर रोजी राहाता तालुक्याचे तहसीलदार अमोल मोरे तसेच तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!