अहिल्यानगर जिल्हाराजकीय

जेष्ठ नेते यशवंतराव गडाखांच्या आवाहनानंतर विखे-थोरात एकत्र; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचालींना वेग

शरद पवार-गडाखांच्या जुन्या राजकीय समीकरणाची चर्चा; ‘अमृतकुटी’वरील बैठकीनंतर जागावाटपाच्या फॉर्म्युल्याकडे लक्ष

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील ‘अमृतकुटी’वर झालेल्या बैठकीत सुजय विखे पाटील यांची उपस्थिती राहिल्याने या घडामोडींना राजकीय संदर्भ प्राप्त झाला आहे.

गडाख यांनी दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करताना जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. निवडणुकीवर होणारा खर्च आणि राजकीय शक्ती खर्च करण्यापेक्षा सहकार क्षेत्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी त्यांची भूमिका आहे. गडाखांच्या या भूमिकेनंतर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागील हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे.

गडाख कुटुंबाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी दीर्घ राजकीय संबंध आहेत. जिल्हा बँकेच्या राजकारणातील पवार-गडाख समीकरणाचा इतिहास पाहता गडाखांच्या भूमिकेकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. मात्र, गडाखांच्या सध्याच्या भूमिकेमागे शरद पवारांचा थेट हस्तक्षेप असल्याचे अधिकृतपणे समोर आलेले नाही. त्यामुळे पवारांचा या घडामोडींमधील सहभाग सध्या राजकीय चर्चेपुरताच आहे.

दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील ‘अमृतकुटी’वर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला सुजय विखे पाटील उपस्थित होते. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि खासदार नीलेश लंके मात्र अनुपस्थित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये परस्परविरोधी राजकीय भूमिकेत असलेले थोरात आणि विखे गट जिल्हा बँकेच्या प्रश्नावर एकाच बैठकीत आल्याने या बैठकीची राजकीय चर्चा रंगली आहे.

जिल्हा बँकेच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटील यांचे दीर्घकाळ प्रभावी स्थान राहिले आहे. आता प्रा. राम शिंदे यांनीही जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय हालचाली सुरू केल्याने समीकरणात आणखी एक महत्त्वाचा घटक आला आहे. राम शिंदे यांनी सहकार क्षेत्रातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या असून, गडाखांच्या बिनविरोध निवडणुकीच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी २१ संचालक पदे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २८ सप्टेंबरपासून सुरू झाली असून ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. ६ ऑक्टोबरला अर्जांची छाननी, ७ ते २१ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २ नोव्हेंबरला मतदान होणार असून ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

आता बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जागावाटपाचा फॉर्म्युला. विविध गटांचे इच्छुक उमेदवार, मतदारसंघनिहाय समीकरणे आणि प्रमुख नेत्यांच्या मागण्या यावर अंतिम सहमती साधावी लागणार आहे. त्यामुळे गडाखांच्या आवाहनानंतर सुरू झालेल्या हालचाली थोरात-विखे यांच्या बैठकीपर्यंत पोहोचल्या असल्या, तरी अंतिम निर्णयासाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!