
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर येथे झालेल्या बैठकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचा प्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे. या भेटीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चांना बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले असून, “सुजय विखे हे माझ्या मुलासारखे आहेत. त्यामुळे त्यांनी पाया पडल्याचा फार बाऊ करण्याची गरज नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे प्रमुख राजकीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात समोरासमोर आले. त्यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.या प्रसंगाचा फोटो आणि बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली. विखे-थोरात यांच्यातील राजकीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर या भेटीची चर्चा रंगली होती. मात्र, या संपूर्ण प्रकारावर बाळासाहेब थोरात यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपल्या संस्कृतीत लहानांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेणे ही आदराची परंपरा आहे. सुजय विखे हे वयाने लहान असून माझ्या मुलाच्या वयाचे आहेत. त्यामुळे त्यांनी नमस्कार करून आशीर्वाद घेतला असेल, तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही.जिल्हा बँकेची निवडणूक आणि सहकार क्षेत्राच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. सहकार क्षेत्रातील प्रश्नांवर सर्वांनी एकत्र येऊन विचारविनिमय करणे गरजेचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली.




