श्रीरामपूर तालुका

शासनदरबारी रब्बीचा तालुका असलेल्या श्रीरामपूरला पहिल्यांदाच खरीप दुष्काळ; २६५ दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश

अविनाश आदिक, अनुराधा आदिक यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

श्रीरामपूर – शासनदरबारी नेहमी रब्बी हंगामाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामपूर तालुक्याचा यंदा पहिल्यांदाच खरीप दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ३४ जिल्ह्यांतील २६५ दुष्काळी तालुक्यांच्या यादीत श्रीरामपूरचा समावेश झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वीच्या भीषण दुष्काळी परिस्थितीतही श्रीरामपूर तालुक्याचा खरीप दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, यंदाच्या खरीप हंगामातील बिकट परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक आणि कृषक समाजाच्या नेत्या अनुराधा आदिक यांनी यासाठी पुढाकार घेतला.

अविनाश आदिक व अनुराधा आदिक यांनी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तालुक्यातील खरीप हंगामातील वस्तुस्थितीचा अधिकृत अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती त्यांच्यासमोर मांडण्यात आली.

या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत श्रीरामपूरचा समावेश करण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.

तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच खरीप हंगामात दुष्काळ जाहीर झाल्याची माहिती अविनाश आदिक यांनी दिली. या निर्णयाबद्दल प्रदेश सरचिटणीस अरुण नाईक यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अविनाश आदिक यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!