अहिल्यानगर जिल्हाकृषीप्रशासकीयमहाराष्ट्र

ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित ठेवून शेतीसाठी उर्वरित पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२७ पर्यंत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन आवश्यक पाणी आरक्षित ठेवावे. त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे शेतीसाठी काटेकोर व सूक्ष्म नियोजन करावे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज असून पाणी संवर्धनासाठी प्रशासनासह नागरिकांनीही एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. नागरिकांना नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

 

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी तालुका टंचाई आढावा बैठक पांडुरंग लॉन्स येथे झाली. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अक्षय कर्डिले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, सध्याची परिस्थिती लक्षात घेता अधिकाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम करावे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्यात यावे. कामात हयगय आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. वीज वितरण विभागाने वीजपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.ग्रामसेवक तसेच तलाठी यांनी बैठकीत शेतकऱ्यांकडून मांडण्यात आलेल्या सूचना व अडचणींची तातडीने दखल घेऊन त्यावर कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

 

निळवंडे आणि मुळा धरणातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन

निळवंडे तसेच मुळा धरणातील उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, पाणी सोडल्यानंतर त्याची गळती होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. मुळा धरणातील गाळ काढण्याबाबतही लवकरच कार्यवाही करण्यात येईल. कॅनॉल कमांड एरियामध्ये चारा लागवडीसाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

जलजीवन मिशनची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी

आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तालुक्यातील जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली.

 

शेतीचे पंचनामे, सौरऊर्जा व उपसा सिंचनावर भर

आमदार अक्षय कर्डिले यांनी तालुक्यात सरसकट शेतीचे पंचनामे करण्याची मागणी केली. पाणीपुरवठा योजनांना सौरऊर्जा पॅनेल बसविल्यास विजेची बचत होण्यास मदत होईल, यासाठी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाबाबत आवश्यक कार्यवाही करावी तसेच उपसा जलसिंचन योजनांमध्ये विविध गावांचा समावेश करून शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!