कृषीपर्यावरणभौगोलिकमहाराष्ट्र

२०२६ मध्ये माझा अंदाज चुकला, माफ करा; राज्यात दुष्काळ पडणार! पंजाबराव डख यांची जाहीर माफी

हवामान अंदाज चुकल्याची कबुली; सोशल मीडियावरील पोस्टनंतर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

परभणी – हवामानाचा अंदाज वर्तविणारे पंजाबराव डख यांनी २०२६ मध्ये आपला अंदाज चुकल्याची कबुली देत शेतकरी बांधवांची माफी मागितली आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, “माफ करा, २०२६ मध्ये माझा अंदाज चुकला, राज्यात दुष्काळ पडणार” असे म्हटल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांच्या या पोस्टनंतर शेतकरी वर्गात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून काही भागांत पिके सुकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, जून २०२६ मध्ये पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात दुष्काळ पडणार नसल्याचा आणि हे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र त्यानंतर अनेक भागांत अपेक्षित पाऊस न झाल्याने आता त्यांनी स्वतःच २०२६ मधील आपला अंदाज चुकल्याचे सांगत माफी मागितली आहे.

डख यांच्या माफीच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या यापूर्वीच्या पावसाच्या अंदाजांचा संदर्भ देत नाराजी व्यक्त केली आहे. पावसाच्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याचा दावा काही प्रतिक्रियांमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता परतीच्या पावसाकडे लागले आहे. पुढील काळात राज्यात किती पाऊस होतो आणि त्याचा खरीप पिकांना कितपत फायदा मिळतो, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.पंजाबराव डख यांच्या “माझा अंदाज चुकला, माफ करा” या वक्तव्यामुळे २०२६ मधील हवामान अंदाजाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, त्यांच्या या कबुलीनंतर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय असतील, याकडेही लक्ष लागले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!