अहिल्यानगर जिल्हागुन्हेगारीमहाराष्ट्र

एकीकडे ड्रग्जविरोधी धडक कारवाई, दुसरीकडे पोलिसांवरच आरोप; अहिल्यानगरमध्ये नेमकं चाललंय काय?

तरुणाला ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप; कोतवालीतील गांजा कारवाई चौकशीच्या फेऱ्यात, मेफेड्रोन प्रकरणाचा तपास एलसीबीकडे

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर : तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सुरू केलेल्या ड्रग्जविरोधी मोहिमेला राजकीय नेतृत्वासह सर्वसामान्यांकडून पाठबळ मिळत असतानाच पोलीस दलातील काही प्रकरणांमुळे या मोहिमेच्या अंमलबजावणीवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. संगमनेर शहरातील एका कारवाईत तरुणाला ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविल्याचा नातेवाईकांचा आरोप, अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांच्या गांजा कारवाईतील कथित विसंगती आणि तोफखाना पोलिसांकडून मेफेड्रोन प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची वेळ आलेली घटना, या तीन प्रकरणांमुळे पोलिसांच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मे २०२६ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू केली. जिल्ह्यातील अंमली पदार्थांची खरेदी-विक्रीची साखळी मोडून काढण्याबरोबरच तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृतीवरही भर देण्यात आला. अहिल्यानगर, श्रीरामपूर, संगमनेरसह जिल्ह्यातील विविध भागांत गांजा, अल्प्राझोलम, मेफेड्रोन आणि नशेची इंजेक्शन्स यांसारख्या अंमली पदार्थांशी संबंधित कारवाया करण्यात आल्या. अहिल्यानगर व श्रीरामपूर शहरात झालेल्या ड्रग्जविरोधी जनजागृती रॅलींमध्ये राजकीय नेत्यांनीही सहभाग घेतला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही या मोहिमेला पाठबळ दिले आहे.

तरुणाला गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप

संगमनेर शहर पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. मात्र, संबंधित तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक सुदर्शन यांची भेट घेत आपल्या मुलाला ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचा आरोप केला. या प्रकरणाशी संबंधित काही सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांसमोर सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एका पोलीस उपनिरीक्षकासह काही कर्मचाऱ्यांचा कथित सहभाग असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली केली असून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.

कोतवालीतील गांजा कारवाईही चौकशीच्या फेऱ्यात

अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी केलेली गांजाची कारवाईही सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहे. या कारवाईदरम्यान तयार करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये, स्टेशन डायरीतील नोंदींमध्ये आणि सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येणाऱ्या घटनाक्रमात विसंगती असल्याची तक्रार करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली. प्राथमिक चौकशीदरम्यान संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ नये आणि चौकशी निष्पक्षपणे पार पडावी, यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यातील चार पोलीस अंमलदारांच्या अन्य पोलीस ठाण्यांत बदल्या करण्यात आल्या. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तातडीने कार्यमुक्त करण्याचे निर्देशही देण्यात आले.

१५७५ ग्रॅम मेफेड्रोन प्रकरणाचा तपास एलसीबीकडे

यापूर्वी तोफखाना पोलिसांनी सावेडी उपनगरात सुमारे १५७५ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते. या कारवाईनंतर गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. मात्र, तपासादरम्यान तपासी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत आरोप झाले. तसेच या प्रकरणातील ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची पुढील साखळी शोधण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी प्रकरणाची दखल घेत तपास तोफखाना पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. त्यानंतर एलसीबीने तपासाला वेग देत ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची साखळी शोधण्यास सुरुवात केली. एलसीबीच्या तपासात आतापर्यंत ५३ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कारवाईतील पारदर्शकतेवर लक्ष

अंमली पदार्थांविरोधात कारवाई करणाऱ्या यंत्रणेतीलच अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आरोप होणे, कारवाईच्या नोंदींमध्ये कथित विसंगती आढळणे किंवा एखाद्या गुन्ह्याचा तपास अपेक्षित पद्धतीने न झाल्याने तो वरिष्ठ तपास यंत्रणेकडे वर्ग करण्याची वेळ येणे, या घटनांमुळे जिल्हा पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ड्रग्जविरोधी मोहिमेतील कारवाया अधिक पारदर्शक पद्धतीने होण्यासोबतच या प्रकरणांतील चौकशीचा निष्कर्षही महत्त्वाचा ठरणार आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!