
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील जवळीक पुन्हा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे, थोरात यांच्या संगमनेर येथील संस्थेच्या गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीनंतर सुजय विखे पाटील यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चेला आणखी उधाण आले आहे.
संगमनेर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा तसेच पोलिस भरतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना सुजय विखे पाटील यांनी थोरात यांच्यासोबत झालेल्या भेटीचा थेट उल्लेख केला. “राजकारणात इतका भयानक बदल झाला आहे की, त्याचे विश्लेषण करणेही कठीण झाले आहे. आपल्याला वाटते की आपण गुप्त बैठका घेतो; मात्र आता कोणतीही बैठक गुप्त राहत नाही. मी काल दुपारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत जेवण करून आलो आहे. आता सांगा, काय करायचे?” असे विखे पाटील म्हणाले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीचा संदर्भ देताना विखे यांनी राजकारणातील बदलांवर भाष्य केले. आपली आणि थोरात यांची भेट झाल्याचे त्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर सांगितल्याने या भेटीची चर्चा अधिक रंगली.
याचवेळी सुजय विखे पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “माझ्या स्वाभिमानापेक्षाही शेतकरी जगला पाहिजे. त्यासाठी कोणाच्याही दारात जायला मी तयार आहे. त्याचा मला कमीपणा वाटत नाही,” असे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असताना जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणे आवश्यक असल्याचे विखे यांनी सांगितले. बँकेमध्ये चुकीचे लोक जाऊ नयेत, यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रयत्न करण्याची भूमिका त्यांनी मांडली.
“तुम्हाला खरे बोलायचे असेल, तर कडू व्हावे लागते. जे सत्य आहे, ते लोकांना सांगितले पाहिजे. करू, पाहू, उद्या या, परवा या, असे सांगणे मला जमत नाही. माझ्याकडे एखाद्या कामासाठी आल्यानंतर एकदा होकार दिला, तर ते काम पूर्ण करतो. नकार दिला तर ते काम महाराष्ट्रात दुसरे कोणी करू शकत नाही,” असेही विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विविध राजकीय गटांमध्ये चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासोबत जेवण केल्याचा केलेला उल्लेख आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणाच्याही दारात जाण्याची तयारी असल्याचे केलेले विधान सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.




