महाराष्ट्रराजकीय

मफलरवाला’ नेता कोण? १० ऑक्टोबरला नाव जाहीर करणार; रोहित पवारांचा दावा

अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी व्हीएसआर कंपनीला वाचविणाऱ्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करण्याचा दावा

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

जामखेड – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी व्हीएसआर कंपनीला वाचविणाऱ्या एका बड्या नेत्याचे नाव १० ऑक्टोबर रोजी जाहीर करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. संबंधित नेत्याने एका कार्यक्रमात डिझाइनचा मफलर घातला होता. त्यामुळे रोहित पवार यांनी त्याचा उल्लेख ‘मफलरवाला नेता’ असा केला आहे.

रोहित पवार यांनी २८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत हा दावा केला. अजित पवार यांच्या विमान अपघाताला आठ महिने उलटूनही तपासाबाबत अपेक्षित माहिती समोर आलेली नसल्याचे सांगत त्यांनी सरकार आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणात व्हीएसआर कंपनीला संरक्षण देण्यासाठी सत्तेचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘मफलरवाला नेता’ नेमका कोण, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर रोहित पवार यांनी छगन भुजबळ आणि अरविंद केजरीवाल हे संबंधित व्यक्ती नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित नेत्याचे नाव आणि छायाचित्र १० ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या पत्रकार परिषदेत जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या आरोपांबाबत १० ऑक्टोबर रोजी पुरावेही सादर करणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. मात्र, सध्या त्यांनी संबंधित नेत्याचे नाव जाहीर केलेले नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना ‘मफलरवाला नेता’ कोण, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, “मफलर मॅन कोण, मला माहिती नाही. त्यांच्याशी चर्चा करेन आणि माहिती मिळाल्यावर बोलेन,” अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली.

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्लॅक बॉक्ससह तपासातील विविध मुद्द्यांवर त्यांनी यापूर्वीही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे १० ऑक्टोबर रोजी रोहित पवार कोणाचे नाव जाहीर करतात आणि कोणते पुरावे समोर ठेवतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!