
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – गोदावरी कालव्याचे उन्हाळी आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक पाटबंधारे विभागाच्या अभियंता शहाणे मॅडम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी दिली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून लाभक्षेत्रातील शेतांतील उभी पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे तातडीने आवर्तन सोडणे अत्यावश्यक आहे. लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरलेली असून सातबारा अर्जही सादर केले आहेत.
तसेच, यावर्षी धरणा समूहातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही पाटबंधारे विभागाकडून योग्य नियोजन होत नसल्याने गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकरी नाराज असल्याचे मत विठ्ठलराव शेळके यांनी व्यक्त केले. “धरणात पाणी असूनही पिके जळत असतील, तर त्या पाण्याचा उपयोग काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ब्रिटिशकालीन काळात ही धरणे शेतीसाठी उभारण्यात आली होती. मात्र सध्या पाण्याचे प्राधान्य शहरांना व उद्योगांना दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यापुढे शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा देत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कालवा सल्लागार समितीवर लोकप्रतिनिधी व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी असले तरी ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पूर्वीप्रमाणे प्रत्येक सेक्शनमध्ये लक्ष देणारे शेतकरी प्रतिनिधी कालवा सल्लागार समितीत नियुक्त करावेत, अशी मागणीही शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.




