
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
अहिल्यानगर -स्नेहालय इंग्लिश मिडीयम शाळेने डिजीटलाईज होण्याकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जी.पी पेट्रोलियम्सच्या सहयोगाने १४ डिजिटल बोर्ड लावण्यात आले. या इंटरऍक्टिव्ह पॅनलचा लोकार्पण सोहळा जी. पी पेट्रोलियमचे व्यवस्थापकीय संचालक मा.अर्जुन वर्मा यांच्या हस्ते पार पडला. या उपक्रमामुळे शाळेतील शिक्षण पद्धतीत क्रांतिकारी बदल होणार आहे, कारण विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकण्याची संधी मिळणार आहे. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा कार्यक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत लक्षणीय बदल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, अध्यक्षा जयाताई जोगदंड, सचिव डॉ. प्रीती भोंबे, शाळेचे मानद संचालक राजेंद्र शुक्रे, स्नेहालय अनिवासी प्रकल्प संचालक हनीफ शेख आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा मुंगी आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेतील शिक्षकांनी डिजिटल बोर्डचा उपयोग करून सादरीकरण केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह पद्धतीने शिकता येईल.विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, डिजिटल बोर्डमुळे शिकायला मजा येईल आणि अवघड गोष्टी समजायला सोप्या होतील. हा कार्यक्रम शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
प्रमुख पाहुणे अर्जुन वर्मा यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना की, “जे काही कार्य करायचं असेल, त्यामध्ये शंभर टक्के मन लावून करा, इतरांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल करा.”असे ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मानद संचालक राजेंद्र शुक्रे यांनी केले. डिजिटल बोर्डच्या वापराबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा मुंगी यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राजक्ता नगरकर आणि पूजा गाडेकर यांनी केले, तर आभार डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
