महाराष्ट्र

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन परिचर्या महाविद्यालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आमच्या परिचारिका, आमचे भविष्य सक्षम परिचारिका जीव वाचवतात या यावर्षीच्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात परिचारिकांच्या सेवाभाव, समर्पण आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. रामचंद्र पडळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब अहिल्यानगर सेंट्रलचे अध्यक्ष श्री. सुनील कटारिया यांची विशेष उपस्थिती लाभली. उपप्राचार्या डॉ. योगिता औताडे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सलोमी तेलधुने यांनी यावर्षीच्या घोषवाक्याचे महत्त्व विशद केले.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागतपर भाषणात परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा कणा असल्याचे सांगण्यात आले. सेवाभाव हीच परिचर्येची खरी ओळख आहे,या प्रेरणादायी विचारांद्वारे परिचारिकांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला.रोटरी क्लब अहिल्यानगर सेंट्रल यांच्या वतीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन अंतर्गत कॉलेज ऑफ नर्सिंगला “बेस्ट कॉलेज अवॉर्ड : निःस्वार्थ सेवा” पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन कार्य, समाजप्रबोधन उपक्रम तसेच रुग्ण आरोग्य सेवेमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला.

 

यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापिकांनाही विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले. डॉ. प्रतिभा चांदेकर यांना “सर्वोत्कृष्ट संशोधक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. योगिता औताडे यांना “सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ” पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. अमोल टेमकर आणि प्रा. सलोमी तेलधुने यांना “सर्वोत्कृष्ट शिक्षक” पुरस्कार मिळाला. श्री. निलेश म्हस्के आणि श्री. स्वप्नील म्हस्के यांना “सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक” पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच कु. विद्या कुर्‍हे यांना “सर्वोत्कृष्ट वर्गशिक्षक” पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक प्रगती, संशोधन, समुदाय आरोग्य जनजागृती, सामाजिक विस्तार उपक्रम आणि रुग्णसेवा यामधील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 

यावेळी रोटरी क्लब अहिल्यानगर सेंट्रलचे अध्यक्ष श्री. सुनील कटारिया आपल्या भाषणात म्हणाले की, फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. त्यांनी आधुनिक परिचर्या सेवेला नवी दिशा देत मानवसेवेचा आदर्श निर्माण केला. महाविद्यालयाच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांनी परिचारिका शिक्षण क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले.

तसेच कार्यक्रमाला रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रलचे सचिव श्री. अमर गुरव, माजी अध्यक्ष श्री. राजेश परदेशी, मेडिकल डायरेक्टर व क्लब प्रभारी डॉ. श्रेया खजगीवाला तसेच श्री. सुनील मुथा उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध उपक्रम उत्साहात पार पडले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आयोजित “स्पंदन” स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपले कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच नर्सिंग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. या लघुपटांमधून परिचारिका व्यवसायाचे महत्त्व, रुग्णसेवा आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी प्रभावीपणे मांडण्यात आली.

कार्यक्रमामध्ये फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या परिचर्या क्षेत्रातील योगदानावर आधारित पोस्टर्स आणि मॉडेल्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या उपक्रमांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रा. अमोल टेमकर यांनी आभार प्रदर्शन केले, तर कु. स्नेहल गोडेगोंकर आणि नॅन्सी क्रॉस यांनी सूत्रसंचालन केले.

सन्माननीय डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वांना शुभेच्छा देत या यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच प्रा. डॉ. अभिजित दिवटे, डायरेक्टर मेडिकल, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन यांनी मार्गदर्शन करून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. कार्यक्रमाचा समारोप परिचारिकांच्या कार्याला सलाम करून करण्यात आला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!