(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर -टंचाई परिस्थितीमध्ये पाणी पुरवठा, चारा उपलब्ध करून देण्या बरोबरच शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेतकरी ,नागरिक आणि प्रत्येक समाजातील घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करून लाभ मिळवून द्यावा असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
श्रीरामपूर येथे तालुकास्तरीय टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार हेमंत ओगले, माजी आमदार लहू कानडे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, महावितरणचे कार्यकारी अभियंता रमेश पवार कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे ,श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी किरण सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधीर बोराळे ,पशुसंवर्धन उपायुक्त उमेश पाटील,तहसीलदार मिलिंद वाघ ,नगरपालिका मुख्याधिकारी मनोज उकिरडे गटविकास अधिकारी स्मिता निकाळजे यांच्यासह तालुकास्तरीय सर्व यंत्रणाचे प्रमुख ,शेतकरी ,श्रीरामपूर तालुक्यातील विविध गावातून आलेले ग्रामस्थ ,सरपंच यांची उपस्थिती होती.
शासन आपल्या दारी या उक्तीप्रमाणे दुष्काळी परिस्थितीमध्ये प्रशासनाने चारा उपलब्ध करून देण्याबाबत,कर्जमाफी, पाण्याची नियोजन व विविध शासकीय योजनांच्या लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा. लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवू नये. प्रत्येक योजनेचा आवश्यक त्या पद्धतीत लाभार्थ्यांना लाभ द्यावा असे आवाहन केले.
पाणी व चारा व्यवस्थापनात अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रभावी नियोजन
चारा व्यवस्थापन करत असताना जिल्ह्यात उपलब्ध असणारा चारा ,पशुधन, पशुधनाची गणना व आवश्यक असणाऱ्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक आणि भविष्यातील नियोजन याबाबत अहिल्यानगर जिल्ह्याने मार्गदर्शक काम केले आहे. यात तालुकास्तरीय आढावा घेतल्याचा हा फायदा असल्याचे त्यांनी येथे नमूद केले. प्रशासनाच्या तालुका निहाय आढावा बैठका घेतल्या जात असून यामध्ये विविध सूचनांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे चारा व्यवस्थापन करण्याबाबत जिल्हा मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
जलजीवन मिशन योजनेच्या कामाबाबत तालुका निहाय अहवाल सादर करावा
जलजीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत होत असताना पाणीपुरवठा योजनेच्या कामांमधील निकृष्टपणा, हलगर्जीपणा व झालेल्या दिरंगाईबाबत जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून याचा अहवाल शासनास सादर करण्याचे यावेळी सूचित करण्यात आले.
पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरण यांनी वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडवून डीपी ,ट्रांसफार्मर. याबाबतची कारवाई करावी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा याबाबत महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वय ठेवणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
प्रवरा कालवा बंदिस्त कामासाठी ४५० कोटींच्या निधीस मंजुरी;
प्रवरा कालव्यावर होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कालवा बंदिस्त करण्याचे कामास मंजुरी मिळाली असून या कामासाठी ४५०कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले .प्रदूषित पाणी नियंत्रण करून कालवा स्वच्छ पाणी वापरासाठी उपलब्ध होईल.कालव्याच्या हद्दीत असलेल्या नागरिकाचे पुनर्वसन आणि इतर बाबींसाठी निधीचा वापर केला जाणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेच्या हक्क आणि हितासाठी प्रशासनाने लोकाभिमुख होऊन योजनेचा लाभ द्यावा आणि समन्वयकाची भूमिका निभवावी असे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी. ग्रामसेवक महसूल अधिकारी त्याचप्रमाणे पशु विकास अधिकारी यांनी विविध गावात भेटीच्या संदर्भातील वेळापत्रक ग्रामपंचायत मध्ये प्रदर्शित करावे जेणेकरून नागरिकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी मदत होईल.श्रीरामपूर तालुक्यातील वांगी, खेर्डी,टाकळीभान, उंदीरगाव, निमगाव, बेलापूर बुद्रुक, भोकर, खैरी या विविध गावच्या पाणी प्रश्न आणि जल जीवन मिशन योजनेच्या कामाचा आढावाही यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या सूचनावर कार्यवाही करण्याचे निर्देश महावितरण, जलजीवन, पाणीपुरवठा आणि जीवन प्राधिकरणास दिले.