(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
नेवासा – पतीच्या आयुष्याला नवी संजीवनी मिळावी आणि कुटुंबाचा संसार पुन्हा आनंदाने फुलावा, यासाठी पत्नीने स्वतःची किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील ॲड. गंगाधर रंगनाथ तुवर (वय ४०) हे गेल्या दोन वर्षांपासून किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. अशा कठीण प्रसंगी त्यांच्या पत्नी दिपाली गंगाधर तुवर (वय ३५) यांनी पतीला किडनी दान करून जीवनदान दिले. या दाम्पत्याच्या त्यागाची आणि अतूट प्रेमाची परिसरात चर्चा होत असून, दिपाली यांच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
ॲड. गंगाधर तुवर यांची प्रकृती गेल्या दोन वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे खालावत होती. डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय सुचवल्यानंतर कुटुंबासमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र, या कठीण परिस्थितीत दिपाली यांनी पतीच्या मदतीसाठी पुढाकार घेत स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे पतीला नवजीवन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
छत्रपती संभाजीनगर येथील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये सुप्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. श्रीगणेश बर्नेला यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नी दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली दोघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती समाधानकारक असल्याने कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिपाली तुवर या राहुरी तालुक्यातील मालुंजा येथील सुभाष दादा पवार यांच्या कन्या आहेत. पतीवरील प्रेम, कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी आणि संकटाच्या काळात दाखवलेले धैर्य यामुळे त्यांनी समाजासमोर त्यागाचा आदर्श ठेवला आहे. पतीच्या आयुष्यासाठी स्वतःच्या आरोग्याची जोखीम स्वीकारत त्यांनी घेतलेला निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या दाम्पत्याला दोन मुले असून, आई-वडील दोघेही सुखरूप घरी परतण्याची अपेक्षा असल्याने कुटुंबीयांसह नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिरेगावसह नेवासा तालुक्यात या घटनेची चर्चा सुरू आहे. पती-पत्नीमधील प्रेम, विश्वास आणि एकमेकांसाठी कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची तयारी या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
संकटात साथ देणारे नातेच खरे!
पतीच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी स्वतःची किडनी दान करणाऱ्या दिपाली तुवर यांच्या निर्णयातून पती-पत्नीमधील अतूट नात्याची प्रचिती आली आहे. त्यांच्या या धाडसाचे आणि त्यागाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.