(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – दुष्काळी परिस्थिती,उसाच्या वजनातील घट आणि यंत्रसामग्रीच्या अडचणींवर मात करून श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा सन २०२६-२७ चा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्यवस्थापन प्रयत्नशील आहे.कारखाना सुरळीत चालविण्यासोबतच ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कामगारांचे हित जपण्यास प्राधान्य देणार,असे प्रतिपादन आ.विवेक भैय्या कोल्हे यांनी केले.
यंदाही किमान प्रतिटन तीन हजार रुपये ऊसदर देण्याचा प्रयत्न राहील,तसेच दिवाळीनिमित्त सभासदांना सवलतीच्या दरात साखर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.श्री गणेश सहकारी साखर कारखाना लि., गणेशनगरच्या सन २०२६-२७ गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व ऊस गळीत हंगाम शुभारंभ सोहळा गोदाधाम सरला बेटाचे मठाधिपती महंत ह.भ.प. श्री रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कारखान्याच्या गळीत हंगामाचे नियोजन, सहकारी साखर उद्योगासमोरील आर्थिक आव्हाने, ऊसदर, सभासदांना साखर वाटप आणि कामगारांचे प्रलंबित प्रश्न याबाबत कोल्हे यांनी भूमिका मांडली.सहकारी साखर उद्योगासमोर सध्या अनेक अडचणी उभ्या आहेत. राज्यातील ३५ हून अधिक साखर कारखाने अवसानात गेले असून, ७० हून अधिक कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या हमीवर सुमारे ५ हजार ५०० कोटी रुपयांची कर्जे असल्याचे कोल्हे यांनी नमूद केले. सहकारी साखर कारखान्यांची संख्या कमी होत असताना खासगी कारखान्यांचे प्रमाण वाढत आहे. या परिस्थितीत सहकारी साखर उद्योग टिकविणे, कारखान्यांचे आर्थिक नियोजन सक्षम करणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील गळीत हंगामात कारखान्याच्या टर्बाइन, बॉयलर आणि जुन्या यंत्रसामग्रीमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने नागवडे कारखान्याकडून आवश्यक भाग उपलब्ध करून घेण्यात आला. यंदा अशा अडचणी पुन्हा निर्माण होऊ नयेत, यासाठी यंत्रसामग्रीची तपासणी आणि देखभाल करण्यावर भर देण्यात येत आहे. कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता ३ हजार मेट्रिक टन असून, हंगामासाठी ३ हजार ५०० कामगारांची भरती करण्यात आली आहे.
यंदा सुरुवातीचे दोन महिने चांगला पाऊस झाला; मात्र त्यानंतरच्या दोन महिन्यांत पावसाने दडी मारल्याने उसाच्या वजनात घट झाली आहे. त्यामुळे सुमारे ३.५ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट गाठताना आव्हाने निर्माण झाली आहेत. दुसरीकडे, इतर कारखान्यांच्या ऊसतोडणी टोळ्या गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दाखल झाल्याने ऊस बाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी मिळण्याबाबत अनिश्चितता असल्याने साखर उद्योगाच्या नियोजनावरही परिणाम होत असल्याचे कोल्हे यांनी नमूद केले.
ऊसदराविषयी भूमिका स्पष्ट करताना कोल्हे म्हणाले की, मागील वर्षी श्री गणेश कारखान्याने प्रतिटन तीन हजार रुपये ऊसदर दिला होता. यंदाही किमान प्रतिटन तीन हजार रुपये दर देण्याचा प्रयत्न राहील. साखरेचा उतारा आणि बाजारभाव यांचा विचार करून पुढील ऊसदर निश्चित केला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवाळीनिमित्त कारखान्याला ऊसपुरवठा करणाऱ्या सभासदांना ५० किलो, तर ऊसपुरवठा न केलेल्या सभासदांना २५ किलो साखर सवलतीच्या दरात देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कारखान्याच्या सभासदांना दिवाळीच्या काळात दिलासा मिळणार आहे.कामगारांनी व्यवस्थापनावर विश्वास ठेवावा आणि राजकीय हेतूने त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बळी पडू नये, असे आवाहन आ.कोल्हे यांनी केले. कारखान्याकडून १९९० पासूनची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी व अन्य देणी अदा करण्यात आली आहेत. सध्याच्या कर्मचाऱ्यांची देणीही मार्गी लावण्याची व्यवस्थापनाची भूमिका आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ज्येष्ठता व हुद्देवाढीच्या प्रश्नावर कार्यवाही करण्यात येत असून, हंगामी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबतही निर्णय घेतले जात आहेत. रोजंदारी व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचाही निर्णय घेण्यात आल्याचे आ.कोल्हे यांनी सांगितले.
या सोहळ्यास श्री उपासनी कन्याकुमारी स्थान, साकुरी येथील क.कु. माधवीताई, गुरु गोदावरी, कालिंदीताई व कन्यावृंद यांची प्रमुख उपस्थिती होती. कारखान्याचे संचालक अनिल गाढवे व संपतराव हिंगे हे पत्नीसह पूजेचे मानकरी होते. ज्येष्ठ नेते गंगाधरजी चौधरी, शिवाजीतात्या लहारे, चंद्रभानजी गुंजाळ, कारखान्याचे चेअरमन सुधीरराव लहारे, व्हाईस चेअरमन विजयराव दंडवते आणि सर्व आजी-माजी संचालक उपस्थित होते. तसेच धनंजय गाडेकर, भारतराव तुरकणे, लताताई डांगे, शितलताई लहारे, चंद्रकांत धनवटे, उत्तमराव मते, अविनाश दंडवते, दिलीपराव क्षीरसागर, उत्तमराव घोरपडे, शरदराव कडू, राजेंद्र निर्मळ, पंकज लोंढे, नानासाहेब गव्हाणे, अविनाश चव्हाण, विक्रम वाघ व घुगरकर साहेब यांच्यासह कारखान्याचे सभासद, शेतकरी बांधव, खातेप्रमुख, कर्मचारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.