अहिल्यानगर जिल्हा

वाकडीत जिओ नेटवर्कचा बोजवारा; दीड वर्षांपासून ग्राहक त्रस्त

वीज जाताच मोबाईल सेवा ठप्प; सात ते आठ दिवसांत सेवा सुरळीत न केल्यास टॉवरला टाळे ठोकण्याचा इशारा

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

वाकडी – राहाता तालुक्यातील वाकडी गावातील जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरची सेवा मागील दीड वर्षापासून विस्कळीत झाली आहे. वीजपुरवठा खंडित होताच मोबाईल सेवा बंद पडत असल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्येचे निराकरण होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वाकडी गावाच्या शेजारील छोट्या गावांमध्ये पाचव्या पिढीतील (५ जी) इंटरनेट सेवा उपलब्ध असताना वाकडीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात मात्र जिओ ग्राहकांना नेटवर्कअभावी त्रास सहन करावा लागत आहे. गावातील जवळपास ८० टक्के ग्राहक जिओ कंपनीची सेवा वापरत असल्याने नेटवर्क बंद पडल्याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर होत आहे.

आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट ही अत्यावश्यक गरज बनली आहे. ऑनलाइन व्यवहार, शासकीय कामे, शिक्षण तसेच दैनंदिन संपर्कासाठी मोबाईल नेटवर्कवर अवलंबून राहावे लागते. मात्र, वीज गेल्यानंतर सेवा खंडित होत असल्याने नागरिकांचा एकमेकांशी संपर्कही तुटत आहे. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट ही अत्यावश्यक गरज बनली आहे. ऑनलाइन व्यवहार, शासकीय कामे, शिक्षण तसेच दैनंदिन संपर्कासाठी मोबाईल नेटवर्कवर अवलंबून राहावे लागते. मात्र, वीज गेल्यानंतर सेवा खंडित होत असल्याने नागरिकांचा एकमेकांशी संपर्कही तुटत आहे. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या समस्येबाबत जिओ कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे ग्राहकांकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, तक्रारींसाठी फोन केल्यानंतर संबंधित वरिष्ठ अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास वरिष्ठांशी संपर्क करण्याचे उत्तर दिले जात असल्याने ग्राहकांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर वाकडी गावातील जिओ ग्राहकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. येत्या सात ते आठ दिवसांत चोवीस तास मोबाईल सेवा सुरळीत न केल्यास जिओ कंपनीविरोधात आंदोलन करण्यात येईल, तसेच गावातील जिओ टॉवरला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

जिओ कंपनीने या समस्येची तातडीने दखल घेऊन टॉवरची तांत्रिक व्यवस्था दुरुस्त करावी आणि वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही मोबाईल सेवा सुरू राहण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाकडीतील ग्राहकांकडून करण्यात येत आहे. आता कंपनीचे अधिकारी या मागणीची दखल घेऊन सेवा सुरळीत करणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!