अहिल्यानगर जिल्हाप्रशासकीयराहाता तालुका

दुष्काळाने होरपळलेल्या पुणतांबा महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतीची अधिकाऱ्यांकडून पाहणी

तालुक्यात दुष्काळी पंचनाम्यांची कार्यवाही अंतिम टप्प्यात, शाश्वत पाणी असलेल्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

पुणतांबा – पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने पुणतांबा (ता. राहाता) महसूल मंडळातील खरीप पिके पूर्णपणे करपली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतीची महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. राहाता तालुक्याचे तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांच्यासह महसूल व कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मंगळवारी विविध शेतांची पाहणी करून पीक नुकसानीची स्थिती जाणून घेतली.पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक शेतांमधील पिके पूर्णपणे करपली असून उत्पादनाची अपेक्षा मावळली आहे. अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासनाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या पंचनाम्यांच्या कार्यवाहीचीही यावेळी पाहणी करण्यात आली.शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे १०० टक्के पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणतांबा महसूल मंडळातील पंचनाम्यांची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ज्या शेतकऱ्यांची आवश्यक कागदपत्रे अद्याप जमा झालेली नाहीत, तसेच बाहेरगावी असलेल्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले.दरम्यान, आगामी काळात पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी शाश्वत पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येत आहे. उपलब्ध पाण्याच्या आधारे चारा पिकांचे योग्य नियोजन करून जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे.

दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पुणतांबा परिसरात जलसंधारणाची कामे सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या कामांमुळे पाणी उपलब्धता वाढण्यास मदत होण्याबरोबरच स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. धनंजय धनवटे, ग्रामपंचायत सदस्य अनिल नळे, भूषण वाघ, शेतकरी नेते बाळासाहेब चव्हाण, अशोक गायकवाड, वैभव डोखे, शरद जगदाळे, संतोष धनवटे, सुनील धनवटे, विलास धनवटे, कृषी अधिकारी किरण धुमाळ, सौ. पुंड, कामगार तलाठी डोके, ग्रामविकास अधिकारी महाजन आदी उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!