अहिल्यानगर जिल्हाकोपरगाव तालुका

दुष्काळाच्या संकटात वाढदिवसाचा थाट नको – मा. आ. स्नेहलताताई कोल्हें

कोपरगाव मतदारसंघात खरीप पिकांचे मोठे नुकसान; फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग्ज व सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

कोपरगाव – महाराष्ट्रासह कोपरगाव मतदारसंघात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत ८ ऑक्टोबर रोजी असलेला आपला वाढदिवस मोठ्या स्वरूपात साजरा करणे योग्य ठरणार नसून या पार्श्वभूमीवर मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी यंदा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, दरवर्षी आपण सर्वजण अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने माझा वाढदिवस साजरा करता. आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेमामुळे हा दिवस माझ्यासाठी नेहमीच विशेष असतो. मात्र, यंदाची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रासह कोपरगाव मतदारसंघात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाअभावी शेतकरी बांधव संकटात आहेत. शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले असून, अशावेळी माझा वाढदिवस साजरा करणे योग्य ठरणार नाही.

सहकारमहर्षी स्व. शंकररावजी कोल्हे साहेबांनी आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या सुख-दुःखाला आपले मानून त्यांच्यासाठी काम केले. त्यांचे विचार आणि संस्कार पुढे नेत असताना, आज तोच शेतकरी संकटात असताना मोठ्या स्वरूपात वाढदिवस साजरा करणे मला योग्य वाटत नाही, असे मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी म्हटले आहे.

त्यामुळे यंदाच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. फ्लेक्स, होर्डिंग्ज, बॅनर किंवा पोस्टर्स लावू नयेत आणि वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करू नये, अशी त्यांनी विनंती केली आहे.वाढदिवसानिमित्त काही सामाजिक कार्य करावेसे वाटत असेल तर आपल्या इच्छेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करावी किंवा समाजाच्या उपयोगी पडेल असे काम करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये आई जगदंबेच्या चरणी एकच प्रार्थना आहे की, या दुष्काळाच्या संकटातून माझ्या शेतकरी बांधवांना सावरण्याचे बळ आईने द्यावे. त्यांच्या शेतात पुन्हा हिरवाई नांदावी, त्यांच्या कष्टाला सुख-समृद्धीची साथ मिळावी आणि त्यांच्या जीवनात पुन्हा आनंदाचे दिवस यावेत, अशी प्रार्थना मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केली.आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि मनापासूनच्या सदिच्छा हीच माझ्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च किंवा अनावश्यक आयोजन करू नये,अशी विनंती मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी सर्व कार्यकर्त्यांना केली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!