अहिल्यानगर जिल्हागुन्हेगारी

शिर्डीजवळ उबेर चालकाला कोयता लावून लुटले; रात्रभर नग्न अवस्थेत फिरवून;हात-पाय बांधून वांबोरीजवळ टाकले

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहुरी – नाशिकहून शिर्डीकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या उबेर चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली. तीन तरुणांनी चालकाचे हात-पाय बांधून, डोळ्यांवर पट्टी व तोंडात बोळा कोंबून त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे काढून मध्यरात्री वांबोरी परिसरातील एका अंधाऱ्या ठिकाणी सोडून देत सुमारे १० लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली ईरिटिगा कार घेऊन ते फरार झाले. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात तीन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोपान गोविंद दंडगुले (वय ३६, रा. साईपार्क लेन, दिघी, पुणे) हे चालक म्हणून काम करतात. पुण्यातील शाम विनोद टुंडाले यांच्या मालकीची एमएच १४ केएन ७७८३ क्रमांकाची ईरिटिगा कार ते भाडेतत्त्वावर चालवत होते. ३० सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता त्यांना उबेर कंपनीकडून पुणे-नाशिक भाडे मिळाले. संबंधित प्रवाशाला रात्री आठ वाजता नाशिक येथे सोडल्यानंतर रात्री ८.४५ वाजता त्यांना नाशिकहून शिर्डीकडे जाण्यासाठी पुन्हा भाडे मिळाले.

उबेर कंपनीकडून मिळालेल्या भाड्यानुसार दंडगुले हे नाशिक रेल्वे स्टेशन येथे गेले. तेथे २० ते २५ वयोगटातील तीन तरुण त्यांच्या कारमध्ये बसले. त्यानंतर सिन्नर, वावी मार्गे ते शिर्डीकडे निघाले. चालक दंडगुले यांनी मोबाईलवर मॅप सुरू केला होता. शिर्डीपासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर असताना या प्रवाशांनी कार पोहेगावच्या दिशेने घेण्यास सांगितले. त्यानुसार कार पुढे गेल्यानंतर सुमारे सात-आठ किलोमीटर अंतरावर मागील सीटवर बसलेल्या एका तरुणाने दंडगुले यांच्या तोंडावर टॉवेल टाकून त्यांना मागे ओढले.

त्याचवेळी शेजारी बसलेल्या तरुणाने कार बंद केली, तर मागील बाजूस बसलेल्या दुसऱ्या तरुणाने कोयता काढून दंडगुले यांच्या गळ्याला लावला. हालचाल केल्यास गळा कापून टाकण्याची धमकी देत त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलचा पासवर्डही विचारून घेतल्यानंतर दंडगुले यांचे हात-पाय बांधून तोंडात बोळा कोंबला आणि डोळ्यांवर चिकटपट्टी लावली. त्यानंतर त्यांना मारहाण करत बराच वेळ कारमधून फिरवण्यात आले.

दरम्यान, आरोपींनी दंडगुले यांच्या अंगावरील कपडे फाडले. मध्यरात्री सुमारे २.३० वाजता त्यांना एका अंधाऱ्या ठिकाणी नग्न अवस्थेत टाकून दिले आणि ईरिटिगा कार घेऊन तिघेही फरार झाले. काही वेळानंतर दंडगुले यांनी कसेबसे हात-पाय व तोंडावरील पट्टी काढली. ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मंदिराजवळ थांबले.

सकाळी काही नागरिक त्या ठिकाणी आले. त्यांनी दंडगुले यांना कपडे दिले. यावेळी आपण राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर दंडगुले राहुरी येथे आले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.

या घटनेत आरोपींनी ईरिटिगा कार, मोबाईल व इतर साहित्य असा सुमारे १० लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी तीन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!