
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव – मतदार संघाला चार हजार कोटींचे खोटे दावे करून ज्यांनी राजरोस फसवले अशा काळे कुटुंबाचे हस्तक बालिशपणाच्या टीका करत आहेत.स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव बस स्थानकात प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल विचारणा करून तेथे सुविधा निर्माण करण्यासाठी भाग पाडले. पाण्याचा अपव्यय, स्वच्छतागृहाची दुरावस्था, सांडपाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा गोष्टींना प्राधान्य देत कृती करण्यासाठी सूचना केल्या यामुळे काळे गटाची पोटदुखी झाली आहे.काळे गटाचा चार हजार कोटींचा खोटा मेकअप जनतेने उतरवल्याने आढाव यांना दुःख झाले असावे अशी जळजळीत टीका भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष अनिता गाडे यांनी निर्मला आढाव यांच्यावर केली आहे.
काळे गटाचे असे आहे स्वतः काही करायचं नाही आणि जनतेला मात्र भुलथापा द्यायच्या. हाच प्रकार करणाऱ्या आ.काळे यांच्या चमच्यांनी कोल्हे यांच्यावर टीका करणे हास्यास्पद आहे. काळे गटाच्या आढाव यांनी त्यांच्या नेत्यांना जनतेने आपला चार हजार कोटींचा खोटा मेकअप नगरपरिषद निवडुकीत उतरवल्याची आठवण करून दिली पाहिजे.निदान महिलांच्या प्रश्नात तरी राजकारण करण्याची दुर्बुद्धी काळे यांना त्यामुळे सुचणार नाही असा सल्लाही दिला आहे.
टीकेला टिकेने उत्तर देणे आम्हाला शक्य आहे मात्र आम्ही अद्यापही संयमाने उत्तर देतो आहोत. आमच्या नेतृत्वावर चुकीच्या पद्धतीने टीका कराल तर उत्तराची सीमा त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक असेल ते सहन करण्याची तयारी ठेवा. महिला आहात तरीही महिलांच्या समस्यांना वाचा फोडली म्हणून तुम्हाला दुःख होत असेल तर त्याचा इलाज आमच्याकडे आहे.आपल्या प्रभागात काय दिवे आपण लावत आहात त्याचेही भाष्य आगामी काळात आम्हाला करावे लागेल असेही शेवटी गाडे म्हणाल्या.
बस स्थानक सुरक्षा आणि स्वच्छता यासाठी स्नेहलताताई कोल्हे यांनी दोन्ही आमदारांना लक्ष घालण्यासाठी सांगितले होते त्यात कुठेही राजकारण आणले नाही मात्र आढाव यांना त्यांच्याच नेत्यावर एक तर विश्वास नाही किंवा महिलांचे प्रश्न सुटतील याचा त्रास एक महिला असून आढाव यांना होत असावा असा टोलाही गाडे यांनी लगावला आहे.



