अहिल्यानगर जिल्हा

प्रसादनगरच्या २५० कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न केंद्राच्या दारात

आप्पासाहेब ढूस, सुरेंद्र थोरात यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे पीएमएवाय-यू २.० योजनेची मागणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क).

 

 

अहिल्यानगर – देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रसादनगर गट क्रमांक ५४२ मधील ४१७ आर जागेवर गेल्या ५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या सुमारे २५० कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता केंद्र सरकारच्या दरबारात पोहोचला आहे. नगरसेविका पल्लवी वैभव ढुस यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस आणि आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन प्रसादनगरसाठी पीएमएवाय-यू २.० योजनेअंतर्गत प्रकल्प मंजूर करण्याची मागणी केली.

अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सर्किट हाऊस येथे झालेल्या भेटीत आप्पासाहेब ढूस यांनी आठवले यांना निवेदन दिले. प्रसादनगरमधील गट क्रमांक ५४२ मधील ४१७ आर जागा डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची आहे. शासनाने सदर जागा झोपडपट्टी म्हणून घोषित केली असून, अनुसूचित जाती-जमाती, भटके तसेच ऊसतोड कामगार समाजातील सुमारे २५० कुटुंबे येथे गेल्या पाच दशकांपासून राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या परिसरात नगरपरिषदेच्या माध्यमातून रस्ते, गटारे आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदर जागा मोकळी करणे अथवा विक्री करणे शक्य नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी झालेल्या डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही आप्पासाहेब भिमराज ढूस यांनी प्रसादनगरचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून पीएमएवाय-यू २.० मधील इन-सिटू स्लम पुनर्विकास योजना राबवून सदर जागा प्रसादनगरच्या रहिवाशांच्या नावे करण्याची मागणी करण्यात आली.

या योजनेमुळे कारखान्याला केंद्राकडून जमिनीचा मोबदला मिळू शकतो, तसेच सुमारे २५० कुटुंबांना हक्काची जागा आणि पक्के घर मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे देवळाली प्रवरा नगरपरिषद झोपडपट्टीमुक्त होण्यासही मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.हा सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. केंद्राने विशेष बाब म्हणून हा प्रकल्प मंजूर करावा,” अशी मागणी आप्पासाहेब ढूस आणि सुरेंद्र थोरात यांनी रामदास आठवले यांच्याकडे केली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!