
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
आश्वी खुर्द – संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे अस्तित्व गणेश तरुण मित्र मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त मंडळाच्या वतीने गावातून भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
विसर्जन मिरवणुकीपूर्वी श्री गणरायाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत छावा ढोल पथक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
आश्वी परिसरात प्रथमच छावा ढोल पथकाचे वादन झाल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल पथकाच्या तालावर तरुणाईसह गणेशभक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संपूर्ण मिरवणुकीदरम्यान ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या गणेशभक्तांच्या उपस्थितीत मिरवणूक भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. अखेर पारंपरिक पद्धतीने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे सदस्य विक्रांत भोसले, साई बिडवे, ऋतिक शिंदे, मयूर जगताप, प्रणव सोनवणे, स्वप्निल गायकवाड, सिद्धार्थ सोनवणे, योगेश शेळके, विनय भोसले, आश्लेष शेळके, गणेश दराडे, ओमकार सोनवणे, संकेत डहाळे, शंकर भोसले, विराज भोसले, प्रशांत शिंदे, तुषार सोनवणे, शुभम लवांडे, अक्षय गायकवाड आणि ऋतिक गायकवाड यांनी परिश्रम घेतले.




