
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर : स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांच्या वक्तव्यावरून विखे कुटुंब आणि खासदार निलेश लंके यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा सुरुवात झाली आहे. नीला विखे यांनी गेल्या दशकभरापासून काका राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी संपर्क नसल्याचे सांगत, आपल्या राजकीय यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली होती. त्यानंतर निलेश लंके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विखे पिता-पुत्रांना टोला लगावला. आता सुजय विखे पाटील यांनी लंके यांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर दिले आहे.
नीला विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर निलेश लंके यांनी सोशल मीडियावर, “आपले कर्तृत्व एवढे मोठे करा की, कालपर्यंत ओळख न देणाऱ्यांनी आज तुमचे नाव घेऊन स्वतःचा मोठेपणा सांगितला पाहिजे!” असे म्हणत नीला विखे पाटील यांचे अभिनंदन केले होते. या पोस्टमधून त्यांनी विखे पिता-पुत्रांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.
यावर प्रतिक्रिया देताना सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर थेट टीका केली. “खासदार निलेश लंके यांचा डायलॉग फिक्स आहे. त्यांना स्वीडन कुठे आहे हे देखील माहिती नाही. त्यामुळे त्यांनी त्यावर काही भाष्य करू नये,” असे सुजय विखे म्हणाले. तसेच मागील दोन वर्षांत लंके यांनी जिल्ह्यासाठी एक रुपयाचाही निधी आणला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, नीला विखे पाटील यांच्या टीकेलाही सुजय विखे यांनी उत्तर दिले. महाराष्ट्रात दुष्काळासह अनेक गंभीर प्रश्न असताना कौटुंबिक विषयावर एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा होणे आश्चर्यकारक असल्याचे त्यांनी म्हटले. नीला विखे पाटील स्वीडनच्या खासदार झाल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर कुटुंबातील एक सदस्य खासदार झाल्याचा आनंद व्यक्त केला, एवढेच आपण म्हटल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“त्या स्वतःच्या कर्तृत्वाने तिकडे काम करत आहेत आणि आम्ही आमच्या कर्तृत्वाने इकडे काम करत आहोत. मग यामध्ये कोणाच्या श्रेयवादाचा विषय कुठे येतो?” असा सवाल सुजय विखे यांनी उपस्थित केला. नीला विखे यांच्या खासदारकीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आपण केला नसल्याचे सांगताना, “आम्ही फटाके फोडले का? फ्लेक्स बोर्ड लावले का? जाहीर सत्कार ठेवला का?” असा सवालही त्यांनी केला.
नीला विखे पाटील यांच्याशी कौटुंबिक संबंध नसले तरी कुटुंबातील एखादी व्यक्ती मोठ्या पदावर गेल्यानंतर चांगली भावना व्यक्त करणे हा संस्कार असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले. या कौटुंबिक विषयाचे राजकारण होऊ नये आणि हा विषय आता थांबवला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे आणि लंके यांच्यातील हा शाब्दिक संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील राजकीय वातावरणात या आरोप-प्रत्यारोपांची चर्चा सुरू आहे.




