
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यांमध्ये होणारा अनावश्यक खर्च आणि डामडौल टाळून साध्या पद्धतीने विवाह करण्याचे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
“दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे डामडौलाने लग्न न करता साध्या पद्धतीने लग्न करा. जो मोठेपणा करता, तो यावर्षी तरी थांबवा, अशी माझी विनंती आहे,” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.
कोरोना काळातील विवाह सोहळ्यांचा दाखला देत विखे पाटील म्हणाले, “कोविडमध्ये साधेपणाने लग्न झाले, त्यांना पोरं झाली नाहीत का?” असा सवाल त्यांनी केला. कोरोना काळात मर्यादित उपस्थितीत आणि साध्या पद्धतीने अनेक विवाह सोहळे पार पडले होते. त्याच धर्तीवर सध्याच्या परिस्थितीतही विवाहातील अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेती आणि ग्रामीण भागावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत विवाह सोहळ्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याऐवजी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन साधेपणाने विवाह करण्याची गरज असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, शेतकरी आणि ग्रामीण भागाला आवश्यक ती मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




