
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार आणि खासदार नीलेश लंके यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रोहित पवारांना सुनावले आहे. “हा प्रकल्प नेमका कोणाच्या काळात रद्द झाला, हे आंदोलनाचा इशारा देणाऱ्यांनी आधी तपासावे. प्रकल्प रद्द होण्यामागचा इतिहास समजून घ्या आणि मग आंदोलनाचा इशारा द्या,” असा टोला शिंदे यांनी लगावला.
डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या मंजुरीचा आदेश ५ ऑक्टोबरपर्यंत निघाला नाही तर शेतकऱ्यांचे आंदोलन उभारण्याचा इशारा रोहित पवार आणि खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे. या बोगद्याला २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
मात्र, राम शिंदे यांनी या दाव्यावरून रोहित पवारांना लक्ष्य केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हा प्रकल्प रद्द झाल्याचे तत्कालीन मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले होते, याची आठवण शिंदे यांनी करून दिली. त्यामुळे प्रकल्पाच्या इतिहासाचा अभ्यास करूनच आंदोलनाची भूमिका घ्यावी, असे त्यांनी म्हटले.
याच मुद्द्यावरून शिंदे यांनी रोहित पवारांवर नाव न घेता निशाणा साधला. संबंधित बैठकीला रोहित पवार उपस्थित असतानाही त्यांनी त्यावेळी काही भूमिका का मांडली नाही, असा सवाल करत “बैठकीला उपस्थित असतानाही मग मूग गिळून का बसले होते?” असा थेट सवाल शिंदे यांनी केला.
दरम्यान, डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या इतिहासावरून सध्या वेगवेगळे दावे पुढे येत आहेत. रोहित पवार यांनी २०१८ मध्ये दिलीप वळसे पाटील यांनीच बोगद्याचा कुकडी प्रकल्पाच्या सुधारित मान्यतेत समावेश करण्यासाठी पत्र दिल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, वळसे पाटील यांनी सध्याच्या मंजुरीला विरोध करत बोगदा मूळ प्रकल्प अहवालात नसल्याची भूमिका मांडली आहे.त्यामुळे डिंभे-माणिकडोह बोगद्याचा प्रश्न आता राजकीय संघर्षाचा मुद्दा बनला आहे. त्यातच रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील शाब्दिक संघर्षामुळे अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.




