
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
नवी दिल्ली – शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील ऋषीचा आश्रम आणि रामेश्वर देवस्थान हे प्राचीन तीर्थक्षेत्र असूनही ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) किंवा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या आतारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ही माहिती दिली. या स्थळांच्या संवर्धन आणि देखभालीसाठी कोणतीही योजना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खा.वाकचौरे यांनी या प्राचीन स्थळांच्या ऐतिहासिक महत्त्वाकडे लक्ष वेधत, ते पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असल्याचे सांगितले. त्यांनी सरकारला या स्थळांच्या संरक्षणासाठी योजना, त्यासाठीचा खर्च आणि वितरित निधीचा तपशील विचारला होता. मात्र, मंत्री शेखावत यांच्या उत्तरात या स्थळात प्राचीन गर्भगृहाचे अवशेष असले तरी छत आणि इतर भाग आधुनिक बांधकामाने पुन्हा उभारले गेल्याचे नमूद करण्यात आले. परिणामी, या स्थळांना संरक्षित दर्जा देण्यात आलेला नाही.
मंत्री शेखावत यांनी पुढे सांगितले की, या स्मारकांच्या जतन आणि देखभालीसाठी केंद्र सरकारकडून कोणतीही योजना तयार करण्यात आलेली नाही किंवा प्रस्तावितही नाही. त्यामुळे खर्च आणि निधी वितरणाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हे उत्तर लोकसभेत सादर करण्यात आले असून, ते महाराष्ट्रातील प्राचीन धार्मिक स्थळांच्या संरक्षणाबाबतच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
या उत्तरामुळे स्थानिक पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ तीर्थक्षेत्र मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करते, तरीही सरकारी पातळीवरून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या मुद्द्यावर पुढील काळात आणखी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे..




