महाराष्ट्रराजकीय

भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवार जाहीर; युवा नेते विवेक कोल्हेंना मोठी संधी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – राज्याच्या राजकारणात लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) कडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. संसदीय समितीच्या मान्यतेनंतर पाच जागांसाठी पाच उमेदवार आणि एका पोटनिवडणुकीसाठी एक उमेदवार अशी एकूण सहा नावांची घोषणा करण्यात आली आहे.

 

या यादीत प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर नियमित जागांसाठी सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना संधी देण्यात आली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांना उमेदवारी मिळाल्याने स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. त्यांनी अलीकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तसेच, वाढदिवसानिमित्त त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.

भाजपचे उपाध्यक्ष राहिलेले संजय भेंडे यांनी नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. माधवी नाईक या दीर्घकाळापासून संघटनेत सक्रिय असून त्यांना संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव आहे. सिंधुदुर्गमधील प्रमोद जठार हे कोकणातील भाजपचे महत्त्वाचे नेते मानले जातात. कोकणाला प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने त्यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात आहे.

 

दरम्यान, विवेक कोल्हे यांची राजकीय पार्श्वभूमीही भक्कम आहे. ते ज्येष्ठ नेते स्व.शंकरराव कोल्हे यांचे नातू असून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र आहेत. नगर जिल्ह्यात कोल्हे कुटुंबाचे वर्चस्व मानले जाते. कोपरगाव मतदारसंघात काळे-कोल्हे असा जुना राजकीय संघर्षही पाहायला मिळतो. विधानसभा निवडणुकीदरम्यान आशुतोष काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीचा धर्म पाळण्याचे निर्देश भाजपकडून कोल्हे यांना देण्यात आले होते.या उमेदवारीच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!