
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी – प्रशांत टेके पाटील
कोपरगाव –तालुक्यातील सडे परिसरात बिबट्याच्या मादीसह दोन बछड्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाजी बारहाते महाराज यांच्या वस्ती परिसरात या बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून, ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. शेतीप्रधान भाग असलेल्या सडे परिसरात पिकांना पाणी देणे, जनावरांची देखभाल करणे तसेच रात्री घराबाहेर पडणे धोक्याचे ठरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी, २७ डिसेंबर रोजी वनविभागाने याच परिसरातून एका बिबट्याला जेरबंद केले होते. मात्र, त्यानंतरही मादी बिबट्या आणि तिची दोन बछडी परिसरात वावरताना दिसत असल्याने वनविभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत असल्याने महिला, वृद्ध आणि लहान मुले विशेषतः भयभीत झाले आहेत. शेतीकामासाठी शेतात जाणे टाळले जात असून, त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याचीही भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवाजी बारहाते यांच्यासह परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची जोरदार मागणी केली आहे. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. केवळ पाहणी आणि सूचना देऊन प्रश्न सुटणार नाही, तर कायमस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
दरम्यान, वनविभागाने परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून, लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. “सडे परिसरातील बिबट्यांच्या वावराची आम्हाला पूर्ण माहिती आहे. लवकरच या ठिकाणी पिंजरा लावून किंवा अन्य योग्य उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी,” असे वनपरिक्षेत्र अधिकारी महबूब शेख यांनी सांगितले.
तथापि, वारंवार बिबट्यांचा वावर आणि वाढती मानव-वन्यजीव संघर्षाची समस्या लक्षात घेता, केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता दीर्घकालीन नियोजनाची गरज असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत वनविभागाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा सडे परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.




