
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव – तालुक्यातील टाकळी फाटा–खिर्डी गणेश शिवार परिसरात शेतीकाम करत असलेल्या एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टरच्या रोटावेटर यंत्रात अडकून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही दुर्घटना आज सोमवार, ५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास घडली.बाळनाथ साहेबराव रोहम (वय अंदाजे ६० वर्षे,) रा. खिर्डी गणेश शिवार असे मृत झालेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळनाथ रोहम हे दुपारी आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटावेटरच्या माध्यमातून मशागतीचे काम करत होते. काम सुरू असताना रोटावेटरमध्ये कचरा अडकला. यंत्र पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी ते कचरा काढण्यास गेले असता, अचानक त्यांचा हात फिरत्या रोटावेटरमध्ये अडकला. यंत्राचा वेग अधिक असल्याने काही क्षणातच ते संपूर्ण यंत्राच्या विळख्यात सापडले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
घटना घडताच आजूबाजूच्या शेतातील शेतकरी व ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रोहम यांचा मृतदेह रोटावेटरमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत अडकलेला पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह यंत्रातून बाहेर काढण्यात आला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बाळनाथ रोहम हे मनमिळाऊ व कष्टाळू शेतकरी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण कोपरगाव तालुक्यात व परिसरात शोककळा पसरली आहे.या दुर्घटनेमुळे शेतीकामासाठी वापरण्यात येणारी आधुनिक यंत्रे हाताळताना आवश्यक ती खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोपरगाव पोलीस करत आहेत.




