
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील वाकडी येथील श्री खंडेराय देवस्थान ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली जय मल्हार आरती मंडळाकडून गेल्या अडीच वर्षांपासून दर रविवारी खंडेरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अन्नछत्रामार्फत महाप्रसादाचा लाभ दिला जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रती जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील वाकडी येथील श्री खंडेराय ह देवस्थान ट्रस्ट सुप्रसिद्ध असून,याठिकाणी अखंड महाराष्ट्रातून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी येत असतात. विशेषतः रविवार हा श्री खंडेरायाचा वार मानला जात असल्याने या दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते.
या अन्नछत्र उपक्रमात अनेक भाविक भक्त स्वयंस्फूर्तीने अन्नदान करून सहभागी होत असून, आमटी, भात, उसळ, लापशी आदी विविध पदार्थांची भक्तिभावाने मेजवानी तयार केली जाते. श्रद्धाळू अनावश्यक खर्च टाळून आपली देणगी थेट श्री खंडेराय देवस्थान ट्रस्टकडे सुपूर्द करीत असून, याच देणगीतून हे अन्नछत्राचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले जात आहे.या उपक्रमाचे भाविकांनी स्वागत केले आहे.
दर रविवारी दुपारी १२ वाजता श्री खंडोबाची आरती होते. सर्वप्रथम देवाला नैवेद्य अर्पण करण्यात येतो. त्यानंतर खंडेराय मंदिराशेजारील प्रशस्त मंडपात भाविकांच्या पंगती बसवून महाप्रसादाचे शिस्तबद्ध वाटप केले जाते. या सेवेसाठी जय मल्हार आरती मंडळाचे स्वयंसेवक, गावातील युवक, ग्रामस्थ, विविध धार्मिक मंडळे तसेच भाविक मोठ्या उत्साहाने सेवा कार्यात सहभागी होतात.
संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून दर आठवड्याच्या रविवारी खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे सुमारे एक हजार ते पंधराशे भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेत असून, या प्रसादामुळे भाविकांचे पोट भरून मन तृप्त होत आहे.या उपक्रमातून सामाजिक व धार्मिक एकोप्याचे सुंदर दर्शन घडत असून, भाविकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. ट्रस्टच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे महाप्रसादाचे वाटप अत्यंत शिस्तबद्ध, सुव्यवस्थित आणि भक्तिभावाने केले जाते.
वाकडी येथील श्री खंडेराय देवस्थान ट्रस्ट व जय मल्हार आरती मंडळ यांच्या संयुक्त नियोजनाने हे अन्नछत्र व महाप्रसादाचे कार्य मागील अडीच वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने अन्नदान करतात. अन्नदानासाठी पुढील पाच महिन्यांचे अॅडव्हान्स बुकिंग आधीच पूर्ण झाले असून, हा उपक्रम अत्यंत सेवाभावी पद्धतीने राबविला जात आहे. या सेवेसाठी कोणीही मानधन घेत नाही.
–ज्ञानेश्वर कोते, जय मल्हार आरती मंडळ, वाकडी




