
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
जळगाव – नवीन वर्षाच्या पावन प्रारंभी राहाता तालुक्यातील जळगाव येथून श्री काशी विश्वेश्वरांचे दिव्य दर्शन व प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमी अयोध्या दर्शनासाठी श्री महादेव मंदिर भक्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक यात्रेचे आयोजन करण्यात आले. सनातन धर्माच्या दोन अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रांकडे निघालेली ही यात्रा श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक ठरली आहे.

दिनांक २ जानेवारी रोजी यात्रेसाठी लक्झरी बसचे विधिवत पूजन करून गावातील सर्व मंडळींच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून हर हर महादेव व जय श्रीरामच्या जयघोषात या यात्रेचे मंगल प्रस्थान करण्यात आले.जळगाव येथील तब्बल ५० भाविक भक्तांनी या यात्रेत सहभाग घेत नववर्षाची सुरुवात ईश्वरचरणी नतमस्तक होत केली.काशी ही मोक्षदायिनी नगरी तर अयोध्या ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असल्याने या दर्शन यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या यात्रेच्या माध्यमातून भाविकांना आत्मशुद्धी, मानसिक शांती व आध्यात्मिक समाधान मिळावे, हा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे श्री महादेव मंदिर भक्त मंडळाकडून दरवर्षी विविध पवित्र तीर्थक्षेत्रांवर भाविकांसाठी अशा दर्शन यात्रांचे आयोजन केले जाते.दरवर्षी गावातील जेष्ठ नागरिक, महिला मोठ्या उत्साहाने यात्रेला जात असतात.या उपक्रमामुळे समाजात धार्मिक संस्कार, भक्तीभाव आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.




