
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – राहाता तालुक्यातील चितळी स्टेशन येथील गेट क्रमांक 55 वरील भुयारी बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दसर्याच्या व सणासुदीच्या काळात वाहनचालकांसह ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बोगद्यातून जाणाऱ्या दुचाक्यांच्या सायलेन्सरमध्ये पाणी शिरून गाड्या बंद पडत आहेत, तर चारचाकी वाहनांच्या बोनेटपर्यंत पाणी पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी नागरिकांमध्ये संतापाची लाट असून सणासुदीच्या दिवसांतही प्रवासात मोठी अडचण निर्माण झाली आहे.
सदर ठिकाणी दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने चितळी गावातून स्टेशनकडे जाणारी संपूर्ण वाहतूक या बोगद्यातूनच केली जाते. मात्र पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होऊन नागरिक व विद्यार्थ्यांना रेल्वे रुळ ओलांडून पलीकडे जावे लागत आहे. यामुळे त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असून रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बोगद्यालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्याच पाण्याचा निचरा सरळ भुयारी बोगद्यात होत असल्याने अडचण अधिक गंभीर झाली आहे. रेल्वे प्रशासनाने मागील काही दिवसांत बोगद्यालगत नाली खोदून व भगदाड पाडून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातूनही दिलासा मिळालेला नाही. उलट नव्याने खोदलेल्या नाल्यात वाहनांचे चाक अडकण्याचा धोका निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानेही तातडीने लक्ष घालून बोगद्यातील साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा, अशी नागरिकांची मागणी आहे.


