महाराष्ट्र

चितळी येथील “सत्यम डिस्टीलरीजमध्ये” सीटीसी कामगारांच्या वेतनवाढीसाठी “ठिय्या देत” बेमुदत आंदोलन सुरू

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – चितळी येथील मध्य निर्मिती करणारी सत्यम डिस्टीलरीज प्रा. लि. कंपनी मधील सीटीसी आस्थापनावर कार्यरत असणाऱ्या कामगारांनी सन्मानजनक वेतनवाढीच्या मागणीसाठी सोमवार,(दि. 29) सप्टेंबर 2025 पासून डिस्टीलरी गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

 

कामगार संघटनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून सीटीसी कामगारांना त्यांच्या कामाच्या प्रमाणात व महागाईला अनुसरून योग्य वेतन दिले जात नाही. राज्य शासनाने खाजगी डिस्टीलरीजसाठी त्रिपक्षीय समितीमार्फत वेतनवाढ व इतर भत्ते निश्चित करणारे परिपत्रक जारी केलेले असतानाही, कंपनीकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

 

मागील वर्षी कामगारांच्या संयमानं कंपनी प्रशासनाच्या विनंतीला मान देत वेतनवाढ पुढे ढकलण्यात आली होती. त्या वेळी झालेल्या बैठकीत जुलै 2024 पासून फरकासहित नव्या दराने वेतनवाढ अंमलात आणण्याचे ठरले होते. मात्र, अद्याप ती लागू करण्यात आलेली नाही.

 

कामगारांनी 6 हजार रुपयांच्या वेतनवाढीची मागणी केली होती; परंतु कंपनी प्रशासनाने केवळ 1500 रुपयांची ऑफर दिली. ही ऑफर अत्यंत अपुरी असल्याचे सांगत संघटनेने ती नाकारली असून, कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.या आंदोलनात शेकडो कर्मचारी सहभागी झालेले आहे.

 

“सत्यम डिस्टिलरी” व्यवस्थापक व प्रशासन जाणीवपूर्वक कामगारांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आमच्या संयमाचा अंत झाला असून सर्व कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

या आंदोलनात जीवन सुरुडे, राजेंद्र बावके, ,विकास वाघ, सागर गायकवाड, महेश येलम,मुकुंद डहाळे, सुनील गायकवाड, रुपेश गायकवाड, विकास, रामा काकडे, रवींद्र वाणी, राजेंद्र तोरणे, महेश सुरुडे, बाबा वाणी, विष्णू थोरात, गणेश चौधरी, सोन्याबापु भोसले,अनिल वाघ, विलास चौधरी, रवी फंड, भानुदास चौधरी आदींसह श्रमिक कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!