
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव-एलमवाडी परिसरात दि. २५ सप्टेंबर २०२५ पासून झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, ऊस, मका, चारा पिके तसेच फळबागांचे अंदाजे ९५ टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, मका पिके पूर्णपणे भुईसपाट झाली असून सोयाबीन शेतात पाणी साचल्याने कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून उत्पादनावर थेट परिणाम झाला आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरींची अतिप्रमाणात पावसामुळे भूस्खलन होऊन पडझड झालेली आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण पुणतांबा मंडळातील शेतकऱ्यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया राहाता तालुक्याचे तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे निवेदन देऊन परिसरातील नुकसानग्रस्त शेतजमिनींचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून शंभर टक्के नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी पुढे सांगितले की, अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या पिकांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून शासनाने त्वरीत मदत जाहीर करावी. तसेच पीक विम्याबाबतही शासनाने लक्ष घालून उत्पादनावर आधारित विमा दाव्यांमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.या संदर्भातील प्रत ग्रामसेवक, सरपंच, कृषी सहाय्यक अधिकारी व तलाठी यांनाही देण्यात आली असून ग्रामपातळीवर पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




