स्नेहालय संस्था अहिल्यानगर

गणेशोत्सवात ‘पोलीस मित्र’ म्हणून स्नेहालयचा सहभाग – कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची माहिती

नगर शहरात गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी विशेष पाऊल - डॉ. गिरीश कुलकर्णी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा होत आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि गणेश मंडळ परिसर गर्दीचे केंद्रबिंदू बनले आहेत. पारंपरिक देखावे, सामाजिक संदेश देणारे स्टॉल्स, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सवाला एक वेगळेच रंगतदार रूप प्राप्त झाले आहे.

या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस स्टेशन आणि स्नेहालय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘पोलीस मित्र’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. स्नेहालय संस्थेचे युवा कार्यकर्ते व कर्मचारी गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनासोबत काम करून गर्दीच्या ठिकाणी जनतेला मदत करणार आहेत. लहान मुले, महिला आणि वयस्कर नागरिकांना सुरक्षित मार्गदर्शन, हरवलेल्या मुलांची शोधमोहीम, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीचे सहाय्य हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

स्नेहालय संस्था गेल्या ३६ वर्षांपासून वंचित महिला, अनाथ बालके आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करत आहे. “मी नाही तर कोण? आणि आज नव्हे तर केव्हा?” या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन स्नेहालय सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी होत आहे. “गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनासोबत थेट काम करण्याची संधी मिळते, हे आमच्यासाठी गौरवाचे आहे,” असे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी सांगितले.

कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी या उपक्रमाचे स्वागत करत स्नेहालयच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. “सामाजिक संस्था पोलीस प्रशासनासोबत काम करत असल्यास केवळ कायदा सुव्यवस्था राखली जात नाही, तर नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना देखील निर्माण होते,” असे ते म्हणाले. नागरिकांनी देखील गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, लहान मुलांना गर्दीत एकटे सोडू नये आणि संशयास्पद गोष्टी दिसल्यास पोलीस किंवा पोलीस मित्रांना तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या प्रसंगी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक निरीक्षक तेजश्री थोरात, हवालदार देवेंद्र पंढरकर, स्नेहालय संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, उडाण प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम, पीआरओ संगीता सानप, रेडिओ नगरचे संदीप शिरसागर, विद्या घोरपडे, विकास सुतार, सागर भिंगारदिवे, उषा खुल्लम, मनोज देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्नेहालय व पोलीस प्रशासनाचा हा संयुक्त उपक्रम गणेशोत्सवाला सुरक्षिततेची जोड देणारा ठरत आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!